जरांगे पाटील ऑडिओक्लिप प्रकरण : शिंदेसेनेचं शिष्ठमंडळ ‘वर्षा निवासस्थानी’ मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीचं अश्वासन

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट घेतली. या भेटीत शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उपसभापती सचिन आहिर, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार राहुल पाटील, खासदार रवींद्र वायकर, दीपक सावंत उपस्थित होते. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन दिलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एसआयटी मार्फत तपासाचं अश्वासन दिल्याचं शिष्ठमंडळातील नेते म्हणाले.
जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बॉम्बच्या धमाक्याचा राज्याच्या राजकारणाला चांगलाच हादरा बसला आहे. या ऑडिओ क्लिपची चौकशी करून सत्य काय ते समोर यावं अशी राजकीय नेत्यांसह महाराष्ट्रातील सर्वसामांन्याची अपेक्षा आहे. जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर मांडलेल्या ऑडिओक्लिपमुळे शिवसेना (शिंदे) गट चांगलाच आक्रमक झाल्याचं चित्र आहे. ऑडिओ क्लिप प्रकरणी शिंदेेसेनेचे शिष्ठमंडळ तातडीने मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवास्थानी दाखल झाले. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या नावांचा उल्लेख येतो, त्यांच्या भूमिका तपासाव्यात, असं निवेदन दिलेल्या राहुल शेवाळे यांनी सांगितलं. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचं अश्वासन दिल्याचं शिवसेना शिष्ठमंडळातील नेते म्हणाले.
आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचं काम केलं आहे. मनोज जरांगे यांनी नाहक आणि ज्याला काही अर्थ नाही, असा आरोप करण्याचं केलं, मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपाचं खंडन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मात्र, पक्ष म्हणून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी असल्याचं सचिन आहिर म्हणाले. सायबर क्राईम, इंटेलिजन्सच्या लोकांच्या माध्यमातून चौकशी करून लवकरात लवकर वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. काही लोक स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणाची गय केली जाणार नाही, असं म्हटलं, असं सचिन आहिर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे वक्तव्य केलं ते निंदनिय आणि बदनामिकारक आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि सायबर सेल द्वारे सत्य समोर आणावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी केलेली कथित वक्तव्य आक्षेपार्ह आणि बदनामीकारक आहेत, अशी मागणी केल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.
या प्रकरणामागे काही कटकारस्थान आहे का? राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणाचा डाव आहे का याची सत्यता तपासण्याची गरज आहे, अशी मागणी केल्याचं राहुल शेवळे म्हणाले. कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत एका महिलेने केलेल्या वक्तव्याची विशेष दखल घेणे गरजेचे आहेत. संबंधित महिला कोण आहे? तिने कोणत्या आधारावर ही विधाने केली? तिच्याकडे याबाबत पुरावे आहेत का? तिला ही माहिती कोणी दिली याची चौकशी झाली पाहिजे.माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळात या संभाषणात सहभागी व्यक्तींचा संबंध भाजपशी असल्याची चर्चा सुरू आहे. तथापि त्याबाबतची अधिकृत माहिती नाही.
आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख यात आहे. या नेत्यांकडे त्याबाबत विचारणा व्हावी, या क्लिपमध्ये काही नावं आली आहेत, त्यात अतुल, निखील, श्वेताजी, गिरीष, अजयजी, जितेनभाई, सुशीलकुमार, पावरा या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय संलग्नता आणि भूमिका काय तपासली गेली पाहिजे.
महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांची बदनामी आणि सहकारी पक्षांविषयी अवमानकारक वक्तव्य करण्याचे प्रयत्न होत असतील तर संबंधितांना कोणतंही राजकीय संरक्षण मिळून नये ही आमची मागणी आहे, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.



Comments