ग्रामस्थांच्या रेट्याने रेशन दुकानदाराचा परवाना रद्द
- Navnath Yewale
- Sep 19
- 1 min read
बोरशेती ग्रामपंचायतीचा जाहीर ग्रामसभेत ठराव, पुरवठा अधिकार्याची कारवाई

डहाणु : पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायतीत रेशन दुकान नियुक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून उसळलेला वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी वारंवार गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा त्यांनाच परवाना दिला. या निर्णयामुळे ग्रामस्थांत प्रचंड संताप निर्माण झाला.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी बोलावलेल्या ग्रामसभेत तब्बल सातशे ते आठशे ग्रामस्थ उपस्थित राहिले. संतप्त घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. पुरवठा विभागाचे अधिकारी सभेत हजर असताना ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने ठाम आणि एकमुखी ठराव केला “सुर्वे यांना कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवण्याची परवानगी नको!”
ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठाम भूमिकेसमोर अखेर पुरवठा विभागालाही झुकावे लागले.
सभेतच अधिकाऱ्यांनी जाहीर केले की, पद्माकर सुर्वे यांचा रेशन परवाना तात्काळ रद्द केला जाईल. पुढील पात्र व्यक्तीची निवड नियमानुसार केली जाईल, असा अधिकृत जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
या घोषणेनंतर ग्रामसभेत समाधान आणि जल्लोषाचे वातावरण पसरले. ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने मिळवलेला हा विजय बोरशेती ग्रामसभेच्या इतिहासात अविस्मरणीय टप्पा म्हणून नोंदला जाणार आहे.
या सभेला ग्रामविकास अधिकारी दीपिका पाटील, सरपंच हरेश भूतखडे, ग्रामपंचायत सदस्य, गावचे पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments