चूकीला माफी नाही, अनगरच्या पाटलांचा माज उतरवणार - उमेश पाटील
- Navnath Yewale
- Nov 21
- 1 min read

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनगर नगरपंचातीत 17 पैकी 17 जागा भाजपने बिनविरोध जिंकल्या आहेत. उज्ज्वला थिटे यांचा आर्ज बाद झाल्याने आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्तापाटील नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत. या विजयाच्या जल्लोषात राजन पाटील यांचे सुपूत्र बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिलं होतं. त्यांनतर बाळराजे राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं. जाहीर दिलगिरी व्यक्त केली.
मात्र, बाळराजे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलेल्या चॅलेंजनंतर राष्ट्रवादी (अ.प) गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आक्रमक झाले आहेत. “ पाटलाला माफी नाही, आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार” असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे. “ बाळराजे पाटलाने मोहोळच्या पंडित देशमुख यांची हत्या केली. त्यातून तो निर्दोष मुक्त झाला असला तरी हायकोर्टात यावर याचिका आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येपेक्षाही भयंकर आणि निर्घृन हत्या पंडित देशमुख यांची झाली होती. हायकोर्टात याविरोधात याचिका दाखल आहे. मात्र 20 वर्षात ही केस बोर्डात आहे. हायकोर्टातील मोठ्या अधिकार्याला हाताशी धरून ही केस बोर्डावर येऊ दिली नाही” असा दावाही उमेश पाटील यांनी केला आहे.
दरम्यान“ पालकमंत्री गोरे हे चांगले नेते आहेत. ते सोलापूर जिल्ह्यासाठी वेळ देत आहेत. मात्र, भाजपाला लक्षात आले आहे की, मोहोळमध्ये फुलायचं असेल, तर डबक्याची गरज आहे. डबक्याची म्हणतोय कारण गटार म्हटलं की त्यांना राग येतो. म्हणून त्यांनी राजन पाटील या डबक्याला पक्षात घेतलं. मात्र पवार कुटुंबाने यांच्यावर एवढे वर्षे उपकार केले. त्यानंतर 15 दिवसापूर्वी पक्ष बदलल्यावर ते अजितदादांबाबत अशी भाषा वापरत आहेत. त्यामुळे आगामी काळात हे मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री यांच्याबद्दल बोलायला मागे पडणार नाहीत” असंही उमेश पाटील म्हणाले.



Comments