top of page

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरुन दोन गटात दगडफेक

चिखला गावात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज; महिलांना मारहाणीचा आरोप, 30 जणांवर गुन्हे दाखल, जरांगे पाटीलांची घटनास्थळाला भेट

बुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणांवरुन हटवण्याच्या कारणवरुन दोन गटात वादाला तोंड फुटले आणि तुफान दगडफेकीची घटना शुक्रवारी (दि.20) बुलढाण्याच्या चिखला (ता. लोणार) येथे घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेला मारहाण करत तीचे कपडे फाडण्यात आले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला होता. या प्रकरणी पोलिसांनी 25 ते 30 जणांवर गुन्हे दाखल केले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घटनास्थळास शनिवारी (दि.21) भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.


चिखला (ता.लोणार) येथील सार्वजनिक ठिकाणी असलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यावरुन शुक्रवारी दोन गटात तुफान दगडफेकीची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिलांना मारहाणीचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला कपडे फाटलेल्या अवस्थेत पुतळ्याकडे धावत आहे, यावेळी तिचा व्हिडिओ शुट करणारा व्यक्ती शिवीगाळ करत आहे. दरम्यान महिलांना कपडे फाटोपर्यंत मारहाण केल्याचा सोशल मिडियावर संतापाची लाट निर्माण झाली आहे.


उपस्थित पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर लोणार पोलिसांनी 25 ते 30 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. गावात तणावपूर्ण शांतता असून प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे.


सोशल मिडियावर घटनेची माहिती मिळताच राज्यभरातून शिवप्रेमींची चिखला गावाकडे रिघ लागली आहे. शनिवारी (दि. 21) मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी घटनास्थळास भेट देवून शांततेचे आवाहन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जरांगे पाटील म्हणाले की, तिथे काही मस्तवाल माजलेल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची विटंबना केली.


त्यांचा उद्देश होता की महाराजांचा पुतळा फेकून द्यायचा असं गावकर्‍यांनी सांगितलं. तिथे आमच्या जिजाऊ च्या लेकीला कपडे फाटेपर्यंत मारलं. येथील काही स्थानिक पोलिसांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. एवढा माज कोणाला आहे? छत्रपती शिवरायांशी एवढा राग कसा काय आहे?. कोण कोण माजलेलं आहे आम्हाला बघू द्या. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केला आहे.


जातिय दंगल घडवण्याचा प्रयत्न होता: आमच्याकडील टोळी जेलमध्ये फेकली. राज्यात आम्ही एक नंबर आहोत. इकडे आलो तर जागा शिल्लक राहणार नाही. कंपाळावर कुंकू छत्रपतींमुळे आहे. जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. पीडित महिला वाघीण आहे. दंगल घडवण्याचा उद्देश होता त्याबाबतची कलमं लावण्यात आली पाहिजे. या लोकांवर जबरी कलम लावा. सगळ्यांना अटक नाही केली तर नाईलाजाने राज्यातील बैठक चिखला गावात लावावी लागेल, याचे सुद्धा परळी कनेक्शन आहे.


पुतळा हटणार नाही: पोलिस अधिकार्‍यांनी आरोपील पळविण्यात मदत केली. 25 तारखेच्या आता त्यांना अटक करा नाही तर पुन्हा येईल. पुतळा कुणीही हलवू शकत नाही. तुमचे पण पुतळे आहेत राज्यात, तुम्हाला महागात पडेल. यांच्या पापाचा घडा भरलाय. त्यांनी आपल्याला संपवायचं ठरवलं आहे. स्वप्न बघ म्हणा तू, देवेंद्र फडणवीस यांनी बघितले आहे, राज्यात आवाहन केले तर किती मराठे येतात ते. पुतळा हटणार नाही, सरपंचालाही अटक करा. 307 सह इतर कलमे लावा. नाही लावले तर गावात आंदोलन करणार असा इशारा देत जबाबदार पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करण्याची मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

Comments


bottom of page