जनसामान्यांचे लाडके दादा,अनंतात विलीन...बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाण मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; मुलगा पार्थ व जय पवारांनी दिला मुखाग्नी, लाखोंच्या साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
- Navnath Yewale
- 6 days ago
- 2 min read

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पार्थिवार आज गुरुवार दि.29 जानेवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाण मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलागा पार्थ व जय पवारांनी मुखाग्नी दिला. लाखो चाहत्यांच्या साश्रुनयनांनी राज्याच्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिला. देशभरातील दिग्गज मान्यवरांसह राज्याच्या मंत्रिमंडळाने अजित दादांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा बुधवारी दि.28 बारामतीच्या विमानतळावर विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात अजित दादासह इतर चार जणांचा मृत्यू झाला. जिल्हापरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचारसभेसाठी काल सकाळी 8:15 वाजता अजित दादांच्या विमानाने मुंबईच्या विमानतळावरून बारामतीच्या दिशेने टेकॉप केले. बारामतीच्या विमानतळावर 8:46 वाजाता लँडिंगदरम्यान त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील त्यांच्या एका सुरक्षारक्षकासह पायलट, कोपायलट, क्रूमेंबर अशा एकून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, प्रथम अजित दादांच्या विमान अपघाताची वार्ता समोर आली ज्यामध्ये अजित दादा जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र, काही वेळातच अजित दादांच्या दुर्दैवी मृत्यूच्या वार्ताने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. घटनास्थळावरुन अजित दादांना बारामतीच्या वैद्यकिय महाविद्यालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी अजित दादांना मृत घोषित केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रासाठी अजित दादाचा परिवार दिल्लीला होता. खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना महिती मिळताच ते तातडीने बारामतीच्या दिशेन रवाना झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयातून थेट बारामतीत पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठकारे सहकुटूंब व राज्यातील दिग्गजांनी पवार कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सुट्टी जाहीर करत राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. दिवसभर विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानात अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. राज्यसह देशभरातून आलेल्या चाहत्यांनी अजित दादांच्या पार्थिवाची अंत्यदर्शन घेतले. गुरुवारी (दि.29) त्याच्या मुळ गावी काटेवाडी येथून सकाळी 10:00 वाजाता अंत्ययात्रेस प्रारंभ करण्यात आला.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी दुपारी 12:00 वाजता विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानात नियोजीत ठिकाणी दादांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी केंद्रीयगृहमंत्री अमित शाह, रस्तेवाहतुक मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, आंध्रप्रदेशचे मंत्री नारा लोकेश, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत दादा पाटील, छगन भुजबळ, अदिती तटकरे, पंकजा मुंडे, मेघणा बोर्डीकर, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, गणेश नाईक, शंभुराज देसाई, राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले, नरहरी झिरवाळ, मंगलप्रभात लोढा,जयकुमार गोरे, प्रफुल्ल पटेल, संजय राठोड, निलम गोर्हे, सचिन आहिर, माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशिल कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदींसह राज्यचं पूर्ण मंत्रिमंडळ
खासदार शाहुमहाराज छत्रपती, निरज चंद्रशेख, कृष्णाजी देवराय, संजय दिना पाटील, धैर्यशिल मोहिते पाटील, श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे, मकरंद आबा पाटील, अशोक मोहिते पाटील, अमित कल्याणी, निवेदीता माने, राजेश टोपे, बाळा नांदगांवर, राजेंद्र गवई, अमदार जयंत पाटील, आमदार रितेश देखमुख आमदार विजयराजे पंडित, सुरेश धस, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल आदी राज्यासह देशभरातून आलेल्या मान्यवरांनी अजित दादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पणकरून श्रद्धांजली वाहिली. पवार कुटुंबीयांतील भावून सर्व सदस्यांचे मान्यवरांनी सांत्वन केले. विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानात लाखोंचा जनसमुदाय आणि चाहत्यांची अमर रहे, अमर रहे.. अजित दादा अमर रहे.., एकच वादा.. अजित दादा.. अजित दादा.., परत या परत या.. अजित दादा परत या..., महाराष्ट्राचा वाघ गेला... या घोषणाबाजीने परिसरत भावूक झाला होता. लाडक्या दादांचे अंत्यदर्शन आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यासह देशभरातून आलेल्या चाहत्यांनी साश्रुनयनांनी दादांना अखेरचा निरोप दिला.
पोलिस बँड पथकाची धुन, हवेत तीन फायर करून दादांना सलामी देण्यात आली. मुलगा पार्थ व जय पवार यांनी मुखाग्नी दिला.



Comments