जरांगे पाटीलांना बदनाम करण्याचं षडयंत्र- आमदार अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना मी पंचवीस वर्षापासून ओळखतो, त्यांच्यावर केले जाणारे आरोप हे त्यांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. ते कितीही कोटी दिले तरी विकले जाणार नाहीत हे लक्षात आल्यामुळे त्यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहेत, असं या सगळ्या आरोपावरून स्पष्ट होत आहे. माझ्यावर जरांगे पाटील यांना सहा कोटी रुपये दिल्याचा आरोप करणार्याला आपण कायदेशीर धडा शिकवू, असा इशाराही शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला. मनोज जरांगूे पाटील यांनी आंदोलनच करू नये, अशी आपली इच्छा होती, त्यासाठी अंतरवाली सराटीत आपण त्यांची भेट घेतली होती असंही आमदार सत्तार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची शनिवारी (दि.19) हॉस्पीटमध्ये भेट घेतल्यानंतर आमदार सत्तार माध्यमांशी बोलत होते.
संभाजीनगरमध्ये गॅलॅक्सी हॉस्पीटलच्या आवारात माध्यमांशी बोलताना आमदार सत्तार म्हणलो, मी मनोज जरांगेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांना भेटलो. रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं सत्तार यांनी माध्यमांना सांगितलं.
मी मनोज जरांगे पाटील यांना संजय शिरसाट यांची बदनामी करण्यासाठी सहा कोटी रुपये दिले, मला पालकमंत्री व्हायचे आहे, हा आरोप करणारा जो कोणी आहे, त्याच्या बुद्धीची कीव येते. त्याचा बंदोबस्त कसा करायचा? कायदेशीररित्या त्यांच्यावर कशी कारवाई करायची? या संदर्भात आपण वकिलाशी बोलणार आहोत. संजय शिरसाट हे माझे मित्र आहे, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मीच त्यांचा सूचक होतो. त्यामुळे अशा आरोपांमध्ये काही तथ्य नाही. असे बिनबुडाचे आरोप करणार्या व्यक्तीची लायकी देखील तपासली पाहिजे, असे म्हणत सत्तार यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.
जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मोठा लढा उभारला आहे. त्यांना व त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचेच टेंडर कुणी दिले आहे का? अशी शंका आता येऊ लागली आहे, असा चिमटाही आमदार सत्तार यांनी काढला.
नांदेडमध्ये दुष्काळी आढावा बैठकीत खासदार संजय जाधव यांनी काजू-बदमांवर ताव मारण्याच्या प्रकारावरून होणार्या टिकेवर आमदार सत्तार म्हणाले, लोकप्रतिनिधींनी संवेदनशिलता दाखवावी, सगळे खापर आधिकार्यांवर फोडून चालणार नाही. तरी देखील संजय जाधव यांना माफ करावे अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
मराठवाड्यासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही सत्तार यावेळी म्हणाले.



Comments