top of page

दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम घटनेचे पडसाद; हिंगोलीत शेतकर्‍यांनी कृषीमंत्र्यांचा ताफा आडवला

16 hours ago
2 min read

हिंगोली: नांदेडमध्ये मराठवाड्याच्या दुष्काळी आढावा बैठकीत मंत्री, खासदारांनी काजू- बदामांवार ताव मारल्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. आढवा बैठक आटोपून हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी आलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकर्‍यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. टाकळगाव येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा आडवून संतप्त शेतकर्‍यांनी मंत्री भरणे यांच्यासमोर काजू-बदाम ठेवून नांदेडमधील बैठकीत घडलेल्या प्रकाराचा निषेध केला.



मराठवाड्यासह राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि करपणार्‍या पिकांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शेतकर्‍यांचे प्रश्न आणि व्यथा समजून घेण्यासाठी शनिवारी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.


मात्र दुष्काळाच्या भीषण वास्तव आणि शेतकरी संकटावर गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी बैठकीला उपस्थित नेते, वरिष्ठ अधिकार्‍यांनी काजू- बदामांवर ताव मारल्याचे उघडकीस आले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


त्याघटनेनंतर आता दुष्काळाची पाहणी करायला गेलेल्या कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकर्‍यांनी बशीतून काजू-बदाम दिले, त्यानंतर आपली निवेदने दिली, यावेळी हिंगोलीमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकर्‍यांच्या बांधावरली पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना शेतकर्‍यांनी घेराव घातला. बैठकीत बसून काजू-बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या असं म्हणत शेतकर्‍यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.


आंदोलक शेतकर्‍यांची समजूत काढताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पाहाणी करण्यासाठी आढावा बैठक आपल्या विभागाची घेतली होती. आज या बैठकीमध्ये अनेक आमदार, खासदारांनी आपली अनेक मतं मांडली, सर्वांनी शेतकरी कसा अडचणीत आहे, शेतकर्‍यांच्या पिकाची अवस्था काय आहे याविषयी त्यांनी माहिती दिली. त्याबाबत सर्व आढावा घेतला आहे आणि निश्चितप्रकारे मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, या विभागातील सर्व शेतकर्‍यांचे शेवटी पीक गेलेलं आहे. पीक जळालेले आहेत, पीक हातून गेले आहे, या पिकांवर माझ्या या शेतकरी बांधवांनी अनेक स्वप्न रंगवली होती.


ती स्वप्न आता भंग झालेली आहेत. या अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये जेवढी म्हणून शेतकर्‍याला जास्त मदत करता येईल, त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला आहे. आम्ही पण सगळे शेतकर्‍यांबरोबर आहोत, सकटाचा सामना आपल्या सर्वांना करावा लागेल, याला सामोरे जावं लागेल, राज्य सरकार म्हणून जी काही मदत करता येईलआणि ज्या ज्या योजनांमधून शेतकर्‍यांना मदत करता यईल, ती मदत त्यांना निश्चित प्रकारे करू, आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यवावर सोडणार नाही मी शेतकर्‍यांना आश्वासित करतो, असंही कृषीमंत्री भरणे म्हणाले.


त्याचबरोबर या काळामध्ये पिण्याचे पाणी असून द्या, चारा टंचाई असू द्या, या बाबतीत भविष्यामध्ये कोणतीही कमतरता होणार नाही. पशुधनाला चारा कमी पडणार नाही आणि पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याबबतीमध्ये कलेक्टर यांना नियोजन करायला सांगितलं आहे. शेतकर्‍यांच्या सर्व भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील, असं अश्वासनही मंत्री भरणे यांनी आंदोलक शेतकर्‍यांना दिल. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकर्‍यांनी काजू-बदाम भेट दिले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी कृषी मंत्र्यांचा निषेध केला.

Comments


bottom of page