जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागाला मिळणार रुग्णालय, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चेतून उलगडला मार्ग – कॅप्टन विनीत मुकणे
- Navnath Yewale
- Sep 11
- 1 min read

पालघर : जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधांची तीव्र गरज होती. मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असूनसुद्धा या भागातील रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करून दूरवरच्या रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या रुग्णालयासाठी जागेच्या अभावामुळे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहिला होता. मात्र अलीकडेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून या प्रश्नाचा मार्ग काढण्याचे काम सुरू झाले आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या जागेवर रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रक्रियेत असून, लवकरच या भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे कॅप्टन विनीत मुकणे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना कॅप्टन मुकणे म्हणाले की, “जव्हार तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या मूलभूत सोयीपासून वंचित राहावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. मात्र आता मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पवित्रा घेतल्यामुळे रुग्णालय उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील जनतेच्या आरोग्यसेवेत मोठा दिलासा मिळणार आहे.”
स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण असून, या निर्णयामुळे आदिवासी भागातील आरोग्य सेवा व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



Comments