top of page

जागतिक दिव्यांगदिनीच नांदेडमध्ये दिव्यांगांचा महाएल्गार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; जिल्हापरिषद कार्यालयासमोर रास्ता रोको

ree

नांदेड: जागतिक दिव्यांगदिन दि.3 डिसेंबर रोजीच नांदेड येथे सकल दिव्यांग संघटना आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हापरिषद, महानगरपालिका आणि जिल्हाआधिकारी कार्यालयावर महाएल्गार मोर्चा काढून तीव्र आक्रोश व्यक्त केला. दिव्यांग बांधवांप्रती शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधि यांच्या उदासीन धोरणाविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी काढलेल्या या आक्रोश मोर्चात शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरूवात झाली. जिल्हापरिषद कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महापालिका कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तत्पूर्वी मोर्चेकर्‍यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे मोर्चा वळवला मात्र पोलिस प्रशासनाने गेट बंद केल्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी जिल्हापरिषदेसमोरच मुख्यरस्त्यावर ठिय्या मांडला. दिव्यांगांच्या ठिय्या आंदोलनामुळे मुख्यरस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती.


सकल दिव्यांग संघटना तथा बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी मोर्चाच्यामागील कारणे स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, दिव्यांग कल्याणासाठी आणि पुनर्वसणासाठी शासनाने काढलेल्या विविध दिव्यांग व्यक्तींसाठीचे हक्क अधिनियम आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.

त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, दिव्यांग शाळा संहिता 2018 नुसार नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग शाळा कार्यरत नाहीत. त्या कार्यरत करावेत, यापूर्वी आमदार आणि खासदार यांच्या निवास्थानांवर व कार्यालयांवर अर्धनग्न अवस्थेत आक्रोश मोर्चा काढून भिक मांगो आंदोलन करूनही लोकप्रतिनिधी त्यांच्याकडील दिव्यांगांचा राखीव निधी अद्यापही खर्च केलेला नाही, तो तातडीने खर्च करावा यासह इतर विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढून दिव्यांग बांधवांनी लोकप्रतिनिधी आणि शासनाचा जागतिक दिव्यांग दिनी निषेध व्यक्त केला.



जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी त्यांच्याकडील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी खर्च करावा यासाठी जिल्ह्यातील आमदार व खासदारांच्या घरावर व कार्यालयावर यूपर्वी दिव्यांग बांधवांनी अर्धनग्न व भिक मांगो आंदोलन करून दिव्यांग निधी खर्च करावा अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी लोकप्रतिनिधींनी फक्त अश्वासनाचे गाजर दिले आणि अद्याप निधी खर्च केला नाही असा आरोप दिव्यांग बांधवांनी केला आहे. दिव्यांग आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत हक्काच्या मागण्यां मान्य करण्याची मागणी केली.

Comments


bottom of page