जालन्यात भाजपकडून खोतकरांना शह?
- Navnath Yewale
- Jul 31
- 2 min read
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलसा गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. गोरंट्याल यांची रावसाहेब दानवेंसोबत असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. शिवाय गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांशी असलेलं राजकीय वैरदेखील सर्वज्ञात आहे. त्यामुळे गोरंट्याल यांना भाजपात घेऊन भाजपने खोतकरांना शह दिलाय का? अशी चर्चा आता जालन्यात रंगू लागली आहे. गेल्या 35 वर्षापासून काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेले जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जालन्याचे नगराध्यक्ष आणि त्यानंतर 3 वेळा जालना विधानसभा मतदार संघातून आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दानवेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. गोरंट्याल हे शिवसेनचे जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक. तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे गोरंट्याल यांना पक्षात प्रवेश देऊन भाजप आणि रावसाहेब दानवेंनी खोतकर यांना ओपन चॅलेंज दिलं आहे का? अशी चर्चा जालन्यात सुरू आहे. दरम्यान, पक्षप्रवेशा नंतर महानगरपालीका स्वबळावर लढवण्याची इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त करत खोतकरांना डिवचलं आहे.
गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. गोरंट्यांल भाजपमध्ये गेल्यानं त्यांची भाजपशी आतापर्यंत असलेली जवळीक उघड झाल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपनं मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं आहे. भाजप बळकट करणं हे भाजपचं स्वप्न असून गोरंट्याल यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट होणार असल्याचा विश्वास भाजप पदाकिधार्यांनी व्यक्त केला.
गोरंट्याल यांच्या प्रवेशाने जालना विधानसभा मतदारसंघात अनेक उपलथापालथ होण्याची शक्यता आहेत. मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रस व मविआचा मतदार फुटणार नाही असा दावा शिवसेना ठाकरे पक्षानं केला आहे.
जालन्याच्या राजकारणात दिर्घकाळ कुणी कुणाचं शत्रू किंवा मित्र राहिलेला नाही. मात्र अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये कायमच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालं आहे. आतापर्यंत गोरंट्याल काँग्रेसमध्ये राहून खोतकरांवर कुरघोडी करत राहिले. रावसाहेब दानवे अर्थात भाजपनं केैलास गोरंट्याल यांना पक्षात घेऊन शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना चेकमेट केलं आहे का ? अशी चर्चा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत जालना काबिज करण्यासाठी भाजपनं उचलेलं हे पाऊल कितपत यशस्वी ठरतंय, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Comments