जालन्यात मोठी घडामोड: जरांगे पाटलांचे सहकारी थेट पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षकांची भेट, पोलिस संरक्षण काढण्याची मागणी
- Navnath Yewale
- Nov 19, 2025
- 2 min read

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. मंत्री तथा अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांवर थेट टीका करताना दिसत आहेत. मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला असा अरोप मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर या दोन्ही नेत्यांत उघड संघर्ष पाहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच मुंडे जरांगे यांनी केलेल्या टीकेला जशास तसे उत्तर देत आहेत. माझी आणि जरांगे यांची नार्कोटेस्ट करा, खरं काय ते समोर येईल, असे थेट आव्हानच मुंडे यांनी दिले होते. मुंडेंचे हे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारलेले आहे. असे असतानाच आता जालना जिल्ह्यातून मोठी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांचा खास माणूस पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. मनोज जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी किशोर मरकड हे जालन्याच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले होते. त्यांनी आज (दि.19) पोलिस अधीक्षकांची भेट घेत मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा काढून घेण्यात यावी अशी मागणी केली. याच मागणीसंदर्भात त्यांनी पेालिसांना एक अर्जही दिला आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माझ्या हत्येच्या कटाप्रकरणी जो तपास आहे तो थंडवल्याची शंका उपस्थित करत पोलिस संरक्षण नाकारणार असल्याचे म्हटले होते.
त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली होती. मला पोलिस सुरक्षा नको, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. त्यानंतर आता जरांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी जरांगे पाटील यांची पोलिस सुरक्षा काढावी अशी मागणी करणारा अर्ज जालन्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे केला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मी खळबळजनक गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला आहे, असा थेट आरोपच जरांगे पाटील यांनी केला होता. त्यासाठी काही कथित कॉल रेकॉर्डिंगची मदत जरांगे पाटील यांनी घेतली होती. जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी समोर येत सर्व आरोप फेटाळले होते. तसेच जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती. तसेच मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, असेही त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले होते. अजूनही या दोन्ही नेत्यांमध्यील वाद संपलेला नाही. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Comments