top of page

झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने भारावले अधिकारी गुणवत्ता परिक्षण भेट; गुणत्तेला दाद, पिंपळनेरच्या शाळेला संरक्षण भिंतीचे अश्वासन

बीड: शिक्षणाच्या बाजारीकरणात मराठी शाळांचे अस्तित्व डळमळत आहे. एकीकडे पटासंख्ये अभावी शासनाला हजारो शाळा बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. मात्र, एखाद्या जिल्हा परिषद शाळेने ठरवले तर केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे, तर गावाचेच काय तालुका आणि जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मन कसे जिंकू शकते हे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर(जि. बीड) शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.


पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.बी. नागरे यांनी सहकार्‍यांसमवेत मंगळवारी (दि.17) पिंपळनेरच्या जिल्हा परिषद शाळेला गुणवत्ता परिक्षण भेट दिली. ट्रेनी शिक्षक सी.पी. पालवे यांच्या विनंतीवरुन थेट शाळेत दाखल झालेल्या ‘बीडीओ साहेबांचे’ विद्यार्थ्यांनी खास शैलीत स्वागत केले. विद्यार्थ्यांचे गुणवत्ता परिक्षणादरम्यान गटविकास अधिकारी बी. बी. नागरे यांनी शालेय अभ्यासक्रमांसह काही जनरल प्रश्नांवर विद्यार्थ्यांना बोलते केले. साहेबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर विद्यार्थ्यांनी धडाधड उत्तरे दिली. तासावर आज विशेष पोषाखातील दिमाखदार गुरुजींना पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह दाटून आला. ग्रामीण भागातील झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेने भारावून गटविकास अधिकारी बी.बी. नागरे यांनी शाळेला सुसज्ज संरक्षण भिंतीचे अश्वासन दिले.


सत्कार आणि मिसळ पाव ची मेजवानी : गटविकास अधिकारी बी.बी. नागरे यांचे शाळेच्या वतिने मुख्यध्यापिका नीलनी ढाकणे, शारदा जायभाय, वैशाली पवार, ट्रेनी शिक्षक सी.पी. पालवे यांच्या वतिने यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यध्यापिका यांच्या वतिने अतिथिंसह विद्यार्थ्यांना खास मिसळपावची मेजवानीचा अस्वाद मिळाला.


शाळेतील विद्यार्थ्यांनी 26 जानेवारीला विद्यार्थ्यांनी केलेल्या भाषणांचे व्हिडिओ गटविकास अधिकार्‍यांनी आवर्जुन पाहिले. कुमारी श्रुतीका जायभाये, हर्षद ससाने, प्रतीक गर्जे आणि समर्थ जायभाये या विद्यार्थ्यांचे अप्रतिम सादरीकरण आणि जबरदस्त आत्मविश्वास पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेत कृतीयुक्त शिक्षणावर दिला जाणारा भर आणि आठवड्यातून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांचीही त्यांनी प्रशंसा केली.


यावेळी गटविकास अधिकारी बी.बी. नागरे म्हणाले की, शाळेतील विद्यार्थी अभ्यासासोबत इतर उपक्रमामध्ये ‘ टॉप लेव्हल’ ला आहेत. विद्यार्थ्यांचे 100 ते 150 पर्यंतचे वर्ग आणि 50 पर्यंत पाढे तोंडपाठ आहेत. शिवाय विद्यार्थी उत्कृष्टपणे इंग्रजी ,मराठी वाचन करतात. यावेळी शाळेचा कायापालट, शिक्षकांची मेहनत आणि गावकर्‍यांची शाळेला असलेली भक्कम साथीने समाधान व्यक्त केले. उपस्थित शिक्षक आणि गावकर्‍यांशी संवाद साधताना ते म्हणाले “ तुम्ही सर्वजण नव्या जोमाने काम करा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” तसेच शाळेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या संरक्षण भिंतीचा विषय लवकर मार्गी लावण्याचे अश्वासनही त्यांनी दिले.


गावातील महिलांना शाळेच्या प्रवाहात आणणारा ‘ हळदी-कुंकू’ कार्यक्रम, मुलींच्याव कलागुणांना वाव देणारी सावित्रिबाई फुले जयंती आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यामुळे शाळेने गावकर्‍यांच्या मनात आपलेपणा निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी बाजार’ हा कृतिशील उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी सरपंच मिठू जायभाये, गणेश ससाने, रोजगार सेवक प्रकाश पालवे यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते

Comments


bottom of page