ममता बॅनर्जींचे भाचे खासदार अभिषेक बनर्जी यांच्यावर हल्ला

पश्चिम बंगाल येथे बॅनर्जी यांची सत्ता जाऊन प्रथम भाजपाचे सरकार आल्यानंतर भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमधील संघर्ष संपण्याचे नाव घेत नसताना, आता पश्चिम बंगालमधील सोनारपूर येथे टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ल्याची माहिती समोर येत आहे. काही निदर्शकांनी त्यांचा रस्ता आडवत त्यांच्यावर दगड फेक केली. यावेळी सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत त्यांना हेल्मेट घालून सुरक्षितपणे जमावापासून कसेबसे बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे.
हा प्रकार सोनारपूर येथील कामराबाद भागात घडल्याचे म्हटले जात आहे. टीएमसीचे खासदार शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्टीच्या एका कार्यकर्त्याचे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबिंयाच्या सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेले होते. सायंकाळी साडे चारच्या सुमारास ते कमराबाद येथे पोहोचले. त्यावेळी तेथे आधीच भाजपाचे कार्यकर्ते जमले होते. या वेळी निदर्शने करताना महिलांना पुढे ठेवण्यात आले होते. या महिला कार्यकर्त्यांनी खासदार अभिषेक बॅनर्जी येताच त्यांच्यावर अंड्यांचा मारा केल्याचे म्हटले जात आहे.
लोकांची गर्दी आणि निदर्शने पाहून अभिषेक बॅनर्जी यांनी आपली कार रस्त्यातच सोडून बाईकने या भागात शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निदर्शकांनी पीडीत कार्यकर्त्याच्या घराच्या शंभर मीटर आधीच त्यांना रोखले. तेव्हा तेथील लोकांनी टीएमसी खासदाराला पाहताच चोर..चोर अशा घोषणा देण्यास सुरू केल्या. त्यावेळी संतप्त जमावाने रस्त्यावर दोन मोटारसायकली देखील फेकल्या आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दगड आणि अंडी फकण्यात आली. पोलिसांनी यावेळी त्यांना हेल्मेट घालून कसे बसे गर्दीतून वाचवत बाहेर काढले.
स्थानिक लोकांनी सांगितले की आम्ही कोणत्याही पक्षाचे सदस्य नाही. येथील रहिवासी आहोत. येथील रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. एक किलोमीटर देखील रस्ता नीट नाही. पावसात येथे पाणी भरते. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना अनेक अर्ज केले. परंतू रस्ते नीट केले नाहीत. पाणी पुरवठा सुरळीत केला नाही, कोणीच आमचा विचार केला नाही अशा प्रतिक्रिया या लोकांनी दिल्या आहेत.
भाजपा प्रायोजित हल्ला : अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या वरील हल्ल्यानंतर भाजपावर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले हे सर्व भाजपा प्रायोजित आहे. तुम्ही स्वत: पाहू शकता माझी काय अवस्था झाली आहे. हा यांच्या लोकशाहीच्या नमूना आहे. या ठिकाणी कोणताही बंदोबस्त दिला नव्हता असाही आरोप त्यांनी केला आहे.



Comments