ठाकरे गट, शिंदे गटाने एकत्र येवून भाजपची 55 वर्षाची सत्ता उलथवून टाकली!
- Navnath Yewale
- Dec 21, 2025
- 1 min read

विटा: राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर केला. या निवडणुकीत भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. तर विदर्भ आणि इतर काही ठिकाणी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी काही नगरपरिषदांची निवडणुक जिंकली आहे. या निवडणुकीत सरशी मिळाल्यामुळे भाजपाने मतदारांचे आभार मानले आहेत. तर ठकारे गटाने मतदानाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेऊन पुन्हा एकदा सत्ताधारी तसेच निवडणुक आयोगाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, या निवडणुकीत सांगलीच्या विटा नगरपरिषदेच्या निवडणुक निकालाची सर्वाधिक चर्चा होत आहे. या निवडणुकीत सांगलीच्या विटा नगरपरिषदेत नवा इतिहास घडला आहे. विटा नगरपरिषदेत शिवसेनेच्या शिंदे गटाचा दणदणीत विजय झाला आहे. येथे भाजपाच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. त्यामुळे या विजयाची महाराष्ट्रभरात चर्चा होत आहे. कारण या निवडणुकीत शिंदे गटाला ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता.
सांगलीच्या विटा नगरपरिषदेवर अखेर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे. विटा नगरपरिषदेत माजी आमदार व भाजपाचे नेते सदाशिव पाटील यांच्या 55 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. येथे सत्तांतर घडवत शिवसेना शिंदे गटाने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतदेखील शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली असून काजल म्हेत्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
दुसरीकडे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत 26 पैकी 22 जागांवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवला. तर भाजपाला अवघ्या चार जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विटा नगरपरिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भजापा अशी दुरंगी लढत झाली होती. शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाने विटा नगर परिषदेवर आपला भगवा फडकवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात इतरही काही ठिकाणी अशाच प्रकारे आश्चर्यकारक निकाल आले आहेत. विदर्भात काँग्रेसला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. तर भाजपाची या ठिकाणी पिछेहाट झाली. या निकालाचा परिणाम आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



Comments