top of page

तटकरेंनी बॅनरवरून अजितदादांचा फोटो हटवला अमोल मिटकरीचा उघड इशारा; देव होण्याचा कोणी प्रयत्न करू नये!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील एका कार्यक्रमातील बॅनरवरून पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचेच फोटो हटलवल्यावरून वाद सुरू झाला आहे. या बॅनरवर केवळ खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा फोटो असल्याने पक्षातील कार्यकर्ते नेते खवळले आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक ट्विट करून सुनील तटकरे यांच्यावर सतांप व्यक्त केला आहे. स्वत:ला देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी तटकरे यांना लक्ष्य केले आहे.


रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब झाल्याचे समोर आले आहे. विलिनीकरण आणि पक्ष ताब्यात घेण्याच्या कथित मुद्यावरून आधीच सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्‍यांच्या निशाण्यावर होते. त्यात आता बॅनरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याच्या मुद्दयावरून तटकरे यांच्यावर जोरदार टीका होत आहे.


“ ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तटकरे यांचे नाव घेण्याचे टाळले असले तरी त्यांचा रोख तटकरे यांच्याकडेच असल्याचे स्पष्ट होते.


दरम्यान, मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारासंघातील इंदापुर येथे माणगांव तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले. मात्र, या बॅनरवर दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नव्हते. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठी बेपत्ता होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.


अजितदादांचा पक्ष ताब्यात घेण्याचे तटकरेंचे प्रयत्न उघड झाले: विकास लवांडे

अजित दादांचा राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचेच मनसुबे लपवून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगड पासून झाली आहे. आदरणीय अजितदादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतघ्नता म्हणतात, अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते किवास लवांडे यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली.


दरम्यान, अजितदादा यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर अनेक वर्षे ठेवल्यामुळे यांची राज्य पातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीयवाद सुद्धा वाढवलेला आहे. जे अजितदादांना पटत नव्हते, सुनील तटकरे तुमच्यात हिम्मत असेल तर स्वत:चा पक्ष प्रफुल्ल पटेल यांन सोबत घेऊन काढावा. किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची चार चौकडी घेऊन तुम्ही जावे. तुमच्या कृतघ्नतेचा तीव्र निषेध, असे लवांडे म्हणाले.

Comments


bottom of page