top of page

तपोवनातील प्रस्तावीत प्रदर्शन केंद्राची निवीदा रद्द नाशिकमध्ये 15 हजार वृक्षारोपन करणार - मंत्री गिरीश महाजन

Dec 6, 2025
1 min read

नाशिक : नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे 1800 झाडांची तोड होणार आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी साधुग्राम उभारायचे आहे त्या ठिकाणी पीपीपी अर्थात पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्शीप तत्ववार प्रदर्शन केंद्र, बॅक्वेंट हॉल, रेस्ट्रोरंट उभारण्याच्या घाट घातला जात आहे. या संदर्भात 220 कोटी रुपयांचे टेंडर महापालिका प्रशासनाने काढले असून 33 वर्षासाठी इथली जागा खासगी विकासकाला दिली जाणार असल्याचा आरोप केला जात आहे. तपोवनमधील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींसह विविध संघटना, विरोधी पक्षांबरोबर सत्ताधारी मित्रपक्षांनही विरोधाची भूमिका घेत अंदोलनाचे सत्र राबविल्यांनतर प्रदर्शन केंद्राच्या विषयावरून मंत्री गिरीश महाजन यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.


दरम्यान, तपोवनातील प्रस्तावीत वृक्षतोडीला विरोध लक्षात घेत गिरीश महाजन म्हणाले की, तपोवन प्रदर्शन केंद्राची निवीदा कशी निघाली माहिती नाही, परंतु एकही झाड तोडून या ठिकाणी प्रदर्शन केंद्र किंवा व्यावसायिक काम होणार नाही. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स ओसासिएशनने (निमा) ही जागा कायस्वरुपी प्रदर्शन केंद्रासाठी मागितली होती. परंतु आम्ही तो प्रस्तावही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.


लहान झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण: गिरीश महाजन पुढे म्हणाले की, कुंभमेळ्यात साधू-महंत तपोवनात राहतात. त्यांची बाहेर व्यवस्था करा, म्हणणे योग्य होणार नाही. साधुग्रामसाठी मागील काही वर्षात वाढलेली लहान झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल. हे पुनर्रोपण 70 टक्यांहून अधिक यशस्वी होईल. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर नाशिक शहरात नव्याने 15 हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. राज्य शासन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. यास नाशिक शहराचा अपवाद नाही.पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच तपोवन परिसरातील दहा वर्षाच्या आतील वृक्षांची तोड न करता त्यांचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Comments


bottom of page