top of page

दाभोण साग देव पाड्याचा रस्त्याचा प्रश्न गंभीर वळणावर! दोन दिवसांत काम न झाल्यास ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन होणार

ree

डहाणू : दाभोण (साग देव पाडा) येथील आदिवासी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे  ग्रामस्थांचा संताप  शिगेला पोहोचला असून, अखेर ग्रामस्थांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला आहे. भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी  पक्षाचे लाल बावटा डहाणू तालुका समिती सदस्य काॅ. किरण दुबळा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासन, पंचायत समिती डहाणू व ग्रामपंचायत दाभोण यांच्याकडे निवेदन सादर केले. गावातील  मुख्य रस्ता खड्ड्यांनी भरून गेला असून तो ग्रामस्थांसाठी जीवघेणा ठरत आहे. या मार्गावरून आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार व आपत्कालीन सेवांना पोहोचणे कठीण झाले आहे. “हे सरळ दुर्लक्ष आणि नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे कृत्य आहे,” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


वारंवार तक्रारी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला जाब विचारला आहे. ग्रामस्थांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की – “जर दोन दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर आम्ही धरणा, मोर्चा व रस्तारोकोसारखे कठोर आंदोलन छेडू.” पत्रकार परिषदेत बोलताना काॅ. किरण दुबळा म्हणाले, “ही केवळ मागणी नाही, तर प्रशासनास दिलेली अंतिम चेतावणी आहे. आमच्या जीवाशी खेळणारे हे दुर्लक्ष  आम्ही  सहन  करणार नाही. जर दुर्लक्ष सुरूच राहिले, तर आम्ही प्रशासनाला जागे करून सोडू.” ग्रामस्थांमध्ये यावेळी तीव्र संताप व्यक्त झाला असून, लढाऊ एकजूटही निर्माण झाली आहे.

Comments


bottom of page