दिवंगत संतोष देशमुख यांच्या घरी चोरी,चोरट्यांनी मौल्यवान साहित्यांसह रोकड लांबवली
कुटुंब झोपत असताना चोरट्यांनी मारला डल्ला; मस्साजोगमध्ये इतर ठिकाणीही घरफोडी

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथे गुरुवारी (दि.9) मध्यरात्री खळबळजनक घटना घडली. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरासह गावातील इतर अनेक ठिकाणी चोरांनी डल्ला मारल्याचे घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी त्यांचे बंधू धनंजय देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख, त्यांची आई आणि कुटुुंबातील इतर सदस्य रात्री झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी घरात प्रवेश केला आणि कोणालाही सुगावा लागू न देता चोरी केली. सकाळी जेव्हा घरातील सदस्य जागे झाले, तेव्हा घरातील सामानाची उस्तवार झालेली पाहून त्यांना धक्काच बसला. कपाटीतील मौल्यवान ऐवज आणि रोकड लांबवल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच केज पोलिस, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. संतोष देशमुख खटल्याची सुनावणी कोर्टात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणूकीची रनधुमाळी सूरू आहे अशातच देशमुखांच्या घरी चोरी झाल्यानं अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
चोरांनी केवळ देशमुखांच्या घरावरच समाधान मानले नाही, तर गावातील तलावावरील विजेच्या पंपाचे साहित्य आणि सोलार पंपाच्या वायर्स देखील चोरुन नेल्या आहेत. एकाच रात्री गावात अनेक ठिकाणी चोर्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे.



Comments