दुध भेसळ प्रकरण तापलं! ‘आका’ चा शोध घेवून रॅकेटचा पर्दाफाश करा-शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्याची मागणी
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

पुणे: मंचर पवरिसरात उघडकीस कथित दूध भेसळ प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा. तसेच या प्रकरणामागील ‘आका’ कोण आहे, याचा शोध घ्यावा. पुतण्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा सहाकारी दूध उत्पादक संघाचे संचालक विष्णू हिंगे यांनी नैतिक जाबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रपवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.
मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.7) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर, राजाराम बाणखेले, शिवसेनेच माजी जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, सचिन बांगर, प्रवीण थोरात, नगरसेवक वसंतराव बाणखेले, प्रशांत अभंग, अजित चव्हाण, निलेश वळसे, विशाल वाबळे, गणेश यादव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
निकम म्हणाले, “ अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रत्येक गावातून निवेदने पाठवावीत. दूध बुधवारी (दि.8) सकाळी दहा वाजता मोर्चाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीपासून होणार आहे. लक्ष्मी रस्ता मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. पुढील आंदोलनाची दिशा याच मोर्चात ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध भेसळ प्रकरणातील आरोपी माझा पुतण्या असला तरी, माझा कोणताही आर्थिक अथवा व्यवसायिक संबंध नाही. असे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक विष्णू हिंगे म्हणाले. प्रशासन या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करून कारवाई करत असून, या घटनेचे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले. तसेच निकम यांनी केलेल्या आरोपांबाबत मी लवकरच सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही हिंगे म्हणाले.
देवदत्त निकम यांनी आपल्या राजीनाम्याची केलेली मागणी फेटाळताना हिंगे म्हणाले,“निकम यांच्या चुलत भावाविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींना विधीमंडळात उपस्थित करण्याविषयी विनंती का केली नाही? तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजा समितीच्या संचालकपदाचा नाजीनामा का दिली नाही? याचे उत्तर त्यांनी प्रथम जनतेला द्यावे, अशी मागणी ही त्यांनी केली.



Comments