top of page

दुष्काळात वन्यजीवांची तहान भागवणार्‍या पाणवठ्यांतील जलसाठ्यांचा सर्रास उपसा , वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात; शिरुरमध्ये ओशाळली संवेदनशिलता?, प्रशासनाच्या खबरदारीच्या उपाय योजना कागदावर

8 hours ago
2 min read

शिरुर कासार : अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यात यंदा ऑक्टोबर महिन्यातच भीषण दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. दिड महिन्यापूर्वी पावसामुळे नदी नाल्यात साचलेले डबके वन्यजीव, पशु-पक्ष्यांची तहान भागवण्यास संजीवनी ठरत आहेत. पाण्याअभावी खरिपाची पिके करपून गेली. एकीकडे कापुस, तुर आदी सहामाहि खरिप पिकांना वाचवण्यात शेतकरी आटापिटा करत आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने पाणीसाठे पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले असले तरी नदी-नाल्यात वन्यजीवांची तहान भागवणार्‍या डबक्यातील पाणीसाठ्यांचा सर्रास उपसा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या शिरुर कासार शहरात सिंदफणा नदीपात्रात समोर आला आहे.


दुष्काळात संभाव्य काळातील भीषण पाणीटंचाईचे गांभीर्य राखून प्रशासनाने सर्व जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत केले आहेत. गावतलाव, पाझर तलाव, साठवण तलाव, मध्यम प्रकल्पातील अत्यल्प पाणीसाठ्यांचा उपसा रोखण्यासाठी विद्यूत रोहित्र्या बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश पाझर तलाव, गावतलाव कोरडे पडल्याने वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.


नदी-नाल्यात पावसाने साचलेले डबकेच वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी संजीवनी ठरत आहेत. नैसर्गीक जलसाठे टिकवण्यासाठी प्रशासन डोळ्यात तेल घालून असले, तरी शिरुर कासार शहरातून प्रवाहीत होणार्‍या सिंदफणा नदी पात्रात शहर शिवारात खडकाळ पात असल्याने जागोजाग पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहेत. दोन महिन्यापासून वन्यजीव, पक्षांसह पशुंची तहान भागवण्यात संजीवनी ठरणार्‍या डबक्यांतील दूषीत पाणीसाठ्याची इतर वापरासाठी सर्रास उपसा सुरू आहे. डबक्यातील पाण्यावर शेकडो पक्षांचे थवे तहान भागवत असले तरी विद्यूत मोटारीने होणार्‍या उपसामुळे अवघ्या आठवडाभरात नदीपात्र कोरडे पडणार आहे.


दुष्काळाची भीषणता एवढी आहे की, परिसरात पाच किलोमिटर अंतरात जलसाठा शोधूनही सापडणार नाही. खडकाळ पात्रामुळे सिंदफणा नदी पात्रात दुषीत पाण्याचे डबके आद्यापर्यंत टिकून आहे. दरम्यान याच डबक्या भोवती दिवसभर शेकडो पक्षांचे थवे तहान भागवत आहे.


वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी लाभदायक ठरणार्‍या या डबक्यातील दुषीत पाणी विद्यूत मोटारीने उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी, ग्राम महसूल कर्मचार्‍यांनी सिंदफणा नदीपात्रातील मोटारी काढण्याच्या सूचना दिल्या, शिवाय काही मोटारी स्वत: डबक्याच्या बाहेर खेचून काढल्या. पण मोजक्या लोकांनी प्रशासनाच्या कारवाईला झूगारुन विद्यूत मोटारी काढण्याचे ढोंग केले. राजकीय वरदहस्ताने बोकाळलेल्या वृत्तीकडून सर्रास वन्यजीवांच्या हक्काच्या जलसाठ्यांतील पाण्याची चोरी केली जात आहे. माणुस तहान भागवण्यासाठी पर्यायी मार्ग आवलंबून तहान भागवणार आहे. सद्यस्थितीत जलसाठे कारेडे पडल्याने तलाव, नदी-नाल्यातील डबक्यावरचं वन्यजीव, पशु-पक्षी, मुक्या जनावरांची मदार आहे. तेच डबक्यातील जलसाठ्यांची प्रशासनाच्या निष्क्रियेतेमुळे सर्रास चोरी केली जात आहे. संभाव्य काळात शिरुर परिसरात वन्यजीवांच्या भटकंतीला प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार ठरणार आहे.


प्रशासनाकडून कारवाईचा फार्स : दुष्काळात जलसाठे पिण्यासाठी आरक्षीत करण्यात आले आहेत. नैसर्गीक जलसाठे पिण्यासाठी आरक्षणीत करण्यात आले असले तरी शिरुर कासार तालुक्यात सर्राच जलसाठ्यातील पाण्याची चोरी केली जात आहे. मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे, पत्रकार बाळकृष्ण मंगरुळकर, नवनाथ येवले यांनी सिंदफणा पात्रातील खडकातील डबक्यातून होणार्‍या पाणीउपसा बाबत प्रशासनाला माहिती दिली असता तालुका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत मंडळ अधिकारी, ग्राममहसूल कर्मचार्‍यांना घटनास्थळावर पाठवून विद्यूत मोटारी काढल्या.


मात्र, कारवाईचा बडेजावपणा करणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांनी मोजक्या मोटारीला हात लावण्याची तसदी घेतली नाही. सामन्य नागरीकांनी विषयाचं गांभीर्य ओळखून संवेदनशीलतेने स्वत:हून मोटारी डबक्यातून काढून घेतल्या. मात्र, मोजक्या मोटारीद्वारे सर्रास पाणी उपसा सुरू असल्याने तालुकाभर उपाय योजनांंसह खबरदारीचा आढावा घेणार्‍या प्रशासनाला मुख्यालयापासून हाके अंतरावरील जलसाठ्यातील उपसाचे गांभीर्य नसावे? असा प्रश्न निर्माण होत असून शिरुर नगरपंचायत हद्दीतील सिंदफणा नदीपात्रात डबक्यातील मोटारी काढण्याच्या केवळ कारवाईचा फार्स ठरला आहे.

Comments


bottom of page