top of page

अभिजीत दिपकेंना जामिन मंजूर; एक वर्ष शांतता राखण्याच्या बॉण्डवर घेतली स्वाक्षरी

6 hours ago
2 min read

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची सुटका झाली आहे. शुक्रवारी (दि.16) ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी एकटे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. आज त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी त्यांना शांतता कराराच्या बॉण्डवर स्वाक्षरी करावी लागली. ज्यात सुमारे वर्षभर शांतता राखण्याचा समावेश आहे, अशी माहिती समोर येत आहे.


शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर अभिजीत दिपकेंची सुटका केली गेली. यानंतर त्यांची मंदिर मार्ग पोलिस ठाण्यातून सुटका करण्यात आली. ते पुन्हा एकदा करोल बाग येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनीश गावंडे यांच्या घरी पोहोचले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या माहितनुसार, दिपकेंवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 आणि 170 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शांतताभंग आणि दखलपात्र गुन्ह्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी ही कलमे दाखल केली जातात. दिपके यांना आज मंदिर मार्ग ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले गेले.


कॅनॉट प्लेस येथे आयोजित ‘ लहरा दो तिरंगा’ निषेध मोर्चापूर्वी शुक्रवारी अभिजीत दिपके आणि नेहा बोरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतली होती. दरम्यान दिल्ली पोलिस कायद्याच्या कलम 65 अंतर्गत अटकेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बोरा यांची सुटका करण्यात आली होती.


‘ कॅनॉट प्लेस’ सेंट्रल पार्कमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता तिरंगा फडकवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारीच दिपके राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना नोटीस बजावली. नागरिक, व्यापारी आणि प्रवासी यांच्या अधिकारांवर गदा आणणारे कृत्य करू नका, असा इशारा त्यांना या नोटिशीतून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दिपके यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एआयएसएच्या नेत्या नेहा बोरा यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर टीका केली होती.


“ पोलिस सामान्य नागरिकांशी अट्टल गुन्हेगारांसारखे वागत आहेत. सध्याच्या आंदोलनाने हे स्पष्टपणे उघड केलं आहे की लोकांना कशा प्रकारे ताब्यात घेतले जात आहे, मग ते दिवसा असो वा संध्याकाळी, त्यांना रात्रभर कोठडीत ठेवले जाते आणि केवळ पुढच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी त्यांची सुटका केली जाते. कोणत्या कायद्यानुसार किंवा आदेशानुसार आंदोलकांना रात्रभर कोठडीत ठेवण्याचरी परवानगी आहे? कायदेशीररित्या, व्यक्तींची विशेषत: महिलांची सुटका सूर्यास्तानंतर केली पाहिजे, तरीही तसे होत नाहीये. याव्यतिरिक्त, गोंधळ आणि अराजकतेचे एक नवीन नॅरेटिव्ह पसरवले जात आहे , असा आरोप नेहा बोरा यांनी केला.

Comments


bottom of page