top of page

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, माजलगावच्या शिंदेवाडी फाट्यावर कार- बसचा भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू

6 hours ago
1 min read

बीड: तुळजापुरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातल्याची दुर्दैवी घटना बीडच्या माजलगाव येथे घडली आहे. बस आणि कारच्या भीषण अपघातात पाच भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा येथे हा भीषण अपघात झाला.


पंढरपूर खामगाव राष्ट्रीय महामार्गावर माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी फाटा परिसरात कार आणि बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करत रास्ता रोको केला. रविवार (दि.18) सकाळी माजलगाव येथील भाविक कारने तुळजापूर दर्शनासाठी निघाले होते. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरून येणार्‍या बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कारचा चक्काचुर झाला.


या भीषण अपघातामध्ये ओमकार महादेव गिरी (वय 25 वर्षे) रा. माजलगाव, अनिल शेप (वय 30 वर्षे) रा.माजलगाव, समर्थ उर्फ माऊली गजानन नामदास (वय 12 वर्षे) रा. मंजरथ, ता. माजलगाव, ऋतिक मोतीलाल बडे (वय 18 वर्षे) रा. फुलेनगर माजलगाव, गजानन महादेव नामदास (वय 36 वर्षे) रा. मंजरथ , ता. माजलगांव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात स्थळी परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून अपघातग्रस्त कारमधील नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवले.


दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असुन खड्ड्यात आदळल्याने कार अनियंत्रित झाली आणि समोरील बसवर धडकली. महामार्गाच्या कामाबाबत खासदार बजरंग सोनवणे यांच्या तक्रारीनंतर मागील काळात दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाकडून पाहणी आणि कामाचा दर्जा तपासण्यात आलेला होती. हा रस्ता खराब असल्याने दररोज अपघात वाढ होत आहेत.

Comments


bottom of page