देवदर्शनाला गेलेल्या बारामतीच्या दम्पत्यामधील भांडण विकोपाला: पतीच बनला हैवान ! केस धरून बेदम मारहाण, धारदार शस्त्राने गळा चिरला; नंतर कारखाली चिरडलं
- Navnath Yewale
- Mar 28
- 1 min read

कर्नाटकमध्ये एका तरुणाने बायकोची निर्घुण हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. हे दाम्पत्य मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामतीचे असून ते कर्नाटकमध्ये देवदर्शनसाठी गेले होते. या तरुणाने बायकोला बेदम मारहाण करत तिचा गळा चिरला त्यानंतर कारखाली चिरडून तिची निर्घुण हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कर्नाटक पोलिसांनी आरोपी नवर्यास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैला (28 वर्षे) (पूर्ण नाव मिळाले नाही) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर अक्षय आरोपी पतीचं नाव आहे. शैला आणि अक्षय देवदर्शनासाठी कर्नाटकातल्या कलबुर्गा जिल्ह्यातील गाणगापूरला गेले होते. गाणगापूरला जाताना दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या अक्षयने रस्त्याच्या कडेला कार उभी केली आणि बायकोला बाहेर खेचत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. अक्षयने शैलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याने धारदार शस्ताने शैलाचा गळा चिरला. एवढ्यावरच न थांबता अक्षयने संतापाच्या भरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शैलाच्या अंगावरुन कार नेत तिला चाकाखाली चिरडलं. यात तिचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, शैला आणि अक्षय या दाम्पत्याचे भांडण सुरू असताना रस्त्यावरून जाणारे नागरिक या घटनेला पाहत राहिले आणि मोबाईलमध्ये ते व्हिडिओ बनवत राहिले. शैला मदतीसाठी विनवनी करीत होती पण कुणी तिला वाचवायला आले नाही. काही नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याच प्रयत्नही केला. मात्र त्यानंतरही आरोपी अक्षय शांत झाला नाही. बायकोला संपवल्यावरच त्याचा राग शांत झाला.
दरम्यान, अक्षय आणि शैला यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. बायकोच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे अक्षयने हे भयंकर कृत्य केले. अक्षयने पूर्वनियोजित कट रचत शैलाची हत्या केली. त्याने देवदर्शनाच्या नावाखाली शैलाला फूस लावत कर्नाटकात नेले आणि त्याठिकाणी तिची हत्या केली. या घटनेनंतर कलबुर्गी पेालिसांनी आरोपी अक्षयला अटक केली आहे. हत्येचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.



Comments