top of page

धक्कादायक आणि संतापजनक: घरात झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या

बीड: बीड तालुक्यातील एका गावातून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. झोपलेल्या विवाहितेला उचलून गावाबाहेर नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यानंतर पिडित महिलेला गावात आणून गावच्या चावडीवर खांबाला बांधून ठेवण्यात आले. हा सर्व प्रकार आज (दि.14) शनिवारी सकाळी समोर येताच गावकर्‍यांनी तत्काळ या विवाहितेची सुटका केली. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आरोपी वैभव पटेकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 17 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


बीड जिल्ह्यातील हिवरापहाडी येथील अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. 11 मार्च रोजी आपल्या घरी झोपली असता गावातील वैभव पटेकर याने पिडितेला उचलून नेत नदीकडील परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, घरातून नेतानाच पिडितेने विरोध केला असता, तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने नेण्यात आले. अत्याचारानंतर गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो पळून गेला. सकाळी ग्रामस्थांनी पिडितेला खांबाला बांधलेल्या अवस्थेत पाहिले असता ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी घटनेचा व्हिडिओ बनवला असून तोही माध्यमांसमोर आला आहे.


दरम्यान, सकाळी घटना समोर आल्यानंतर गावचे सरपंच, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आल्यानंतरच पिडितेची खांबापासून सुटका करण्यात आल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार हिवरापहाडी येथे समोर आला आहे. या प्रकाराणे पिडिता प्रचंड घाबरलेली होती, त्यामुळे तिने त्या दिवशी कुठलीच तक्रार दिली नाही. त्यानंतर, आज कुटुंबीयांना घटनेची आपबिती सांगितल्यानंतर पिडित अल्पवयीन विवाहितेने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपीला अटक करून पिंपळनेर पोलिसांनी त्यास न्यायालयालयात हजर केले असता मा. न्यायालयाने 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


दरम्यान, या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांसह पिंक पथकाकडून तपास केला जात आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पिडिता अल्पवयीन असल्याने आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.

Comments


bottom of page