धक्कादायक: बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह आढळला
- Navnath Yewale
- 17 minutes ago
- 1 min read
बीडचा गुंडाराज थांबणार कधी?, आरोपीं महिला पोलिसांच्या ताब्यात

बीड शहरात धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बेपत्ता तक्रारीनंतर एका होमगार्ड महिलेचा मृतदेह गुरुवारी (21 ऑगस्ट) सकाळी अढळून आला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यानंतर बीड जिल्ह्यातील गुंडाराज कधी थांबणार? असा सवाला उपस्थित होत आहे.
आयोध्या राहुल व्हरकटे (वय 27,रा. बीड) असे मृत महिलेचे नांव आहे. आयोध्या ही होमगार्ड म्हणून कार्यरत होती. ती काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. आज सकाळी बीड तालुक्यातील पांगरी गावाच्या पुढे एका नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह सापडताच परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी सुरू केली. चौकशीतून वृंदावनी खरसाडे ( वय 35, रा. गिरामनगर, बीड) हिने आयोध्या व्हरकटेच्या खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. प्राथमिक माहितीनुसार मृत व आरोपी महिला या दोघीही एकाच गावच्या रहिवासी असून, सध्या बीड शहरातील गिरामनगर भागात वास्तव्यास होत्या.
या खूनामागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, दोन महिलांमधील पूर्वीपासूनचे काही वैयक्तिक वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, आरोपी वृंदावनी खरसाडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीतून खुनाचे खरे कारण उघड होण्याची शक्यता आहे. या घटनेने बीड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, होमगार्ड दलातही मोठी खळबळ माजली आहे.
Comments