top of page

धनगर समाज आंदोलक दीपक बोर्‍हाडे यांचे उपोषण मागे

प्रकृती खालावल्याने समाज बांधवांच्या विनंतीने मुलीच्या हस्ते ज्यूस घेवून सोडले उपोषण

ree

जालना: धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथे दीपक बोर्‍हाडे यांनी आज 16 व्या दिवसी उपोषण मागे घेतले. आंदोलनकर्ते दिपक बोर्‍हाडे यांची उपोषणामुळे प्रकृती खालवली होती. समाज बांधवांच्या विनंतीनंतर मुलीच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडले.


धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक दीपक बोर्‍हाडे यांनी दि.16 सप्टेंबर पासून जालना येथे उपोषण सुरू केले होते. आंदोलक दीपक बोर्‍हाडे यांच्या समर्थनार्थ धनगर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनकर्ते दीपक बोर्‍हाडे यांच्याशी मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रिमंडळाच्या शिष्ठमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली. अखेर आज आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी दीपक बोर्‍हाडे यांची प्रकृती खालवल्याने समाज बांधवांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी एका मुलीच्या हस्ते ज्यूस घेवून उपोषण सोडले. उपोषण सोडण्यापूर्वी बोर्‍हाडे यांनी त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली आणि बैठकीत उपोषण सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.


दरम्यान. सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. हा लढा टिकला पाहिजे, सरकारकडून आम्ही आशावादी आहोत. उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार असून गाव खेड्यातला धनगर एकत्र आणणार आहे. त्यामुळं मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊ, असा इशारा यावेळी दीपक बोर्‍हाडे यांनी सरकारला दिला आहे. आधी सरकारच्या शिष्टमंडळाने दीपक बोर्‍हाडे यांची भेट घेवून यावर तोडगा काढण्यासाठी वेळ मागितला होता. मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. त्यावेळी महाजन यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, मात्र बोर्‍हाडे यांनी उपोषण मागे घेतले नव्हते.


धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता दीपक बोर्‍हाडे हे उपचार घेणार आहेत. दीपक बोर्‍हाडे उपचार घेऊन प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांच्या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Comments


bottom of page