top of page

धनगरआरक्षण आंदोलक दिपक बोराडे मुंबईकडे रवाना बीडच्या गेवराई बागपिंपळगावात पोलिसांनी आंदोलकांना रोखले

बीड: धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (दि. 20 जानेवारी) पासून मुुंबईच्या आझाद मैदानावर होणार्‍या उपोषणासाठी धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे मुंबईकडे रवाना झाले. आंदोलक दिपक बोराडे यांनी रेल्वेने मुंबईकडे निघाल्याचे सांगत पोलिसांनी मला अटक केल्यास समाज बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे यांनी जालन्यात उपोषण आंदोलन केले होते.


समाजाच्या भावनांची दखल घेवून सरकारने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अन्यथा मुंबईच्या आझाद मैदानावर (दि.20) जानेवारी समाज बांधवांसह आंदोलनाचा इशारा दिला होता. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासानाने जालन्यात संचारबंदी लागू केली. दोन दिवसांपासून संचारबंदी लागू असल्याने सोमवारी दिपक बोराडे यांच्या आंबड निवास्थाना बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला.


आंदोलक दिपक बोराडे यांना नजरकैद केल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत होता. आंदोलनावर ठाम दिपक बोराडे यांनी सकाळी सोशल मिडियाच्या फेसबुक अकाऊंड वरुन मी मुंबईकडे निघालो आहे, रेल्वेने मुंबईला जाणार आहे, मला पोलिसांनी अटक केल्यास राज्यभरातील समाज बांधवांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत संताप व्यक्त केला. आंदोलक दिपक बोराडे म्हणाले की, शासनाने धनगर समाजास वेड्यात काढलं आहे.


धनगरांसोबत मजाक लावली का,पोलिसा ऐकत नाही कोर्ट ऐकत नाही, महाराष्ट्रातला तीन कोटी धनगर म्हणजे काय मजाक वाटली काय, सगळे धनगर रस्त्यावर या महाराष्ट्रातले. माजलगाव, बीड येथून पूर्ण ताफा निघणार आहे. सगळे माजलगाव तालुक्यातील बीड- परळी रस्त्यावर या तुमच्या गाड्या मुंबईपर्यंत आल्या पाहिजे, मी रेल्वेने पोहोचतो चला उभा लावा फोन असे आवाहन करत दिपक बोराडे यांनी संताप व्यक्त केला.



पोलिसांनी आंदोलकांना रोखले: धनगर आरक्षण आंदोलक दिपक बोराडे यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांना बीडच्या गेवाराई पोलिसांनी सोलापूर-धूळे महामार्गावर रोखले. आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केल्याने तनाव निर्माण झाला होता. मात्र, आंदोलकांना पर्यायी मार्ग शोधून मुंबईकडे रवाना झाले.

Comments


bottom of page