धुंदलवाडी ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा
- Navnath Yewale
- Sep 17
- 1 min read

तलासरी : ग्रामपंचायत धुंदलवाडी (ता. डहाणू) येथे दि. १७ (सप्टेंबर ) रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामस्तरीय कार्यशाळा तसेच महा आवास अभियान २०२३–२४ व २०२४–२५ या साठी तालुका स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघरच्या प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते आणि पंचायत समिती डहाणूच्या गटविकास अधिकारी (उ.श्रे.) पल्लवी सस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत धुंदलवाडीच्या सरपंच सौ. प्रभावती सोनू महाला अध्यक्षस्थानी होत्या.या वेळी गावचे उपसरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, यानिमित्ताने आयोजित विशेष ग्रामसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.या ग्रामसभेत सुमारे २०० ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्यशाळेत ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्याबरोबरच समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्दिष्टे व योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीने या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन चांगली कामगिरी करावी, असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.
या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये विकास योजनांविषयी जागरूकता निर्माण झाली असून, गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



Comments