नगरपरिषद निवडणूकीत धनंजय मुंडेना वाल्मिक कराडची आठवण!
- Navnath Yewale
- Nov 25
- 3 min read
वाल्मिकच्या कमतरतेची धनंजय मुंडेंना जाणीव, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड गेल्या काही महिन्यांपासून बीडच्या कारागृहात कैद आहे. देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडाच्या कमतरतेची जाणीव होत असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी परळी येथील नगरपरिषदेच्या निवडणुक प्रचारसभेत केले. धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याने पुन्हा खळबळ उडाली असून सामाजिक व राजकियक्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणाशी मुंडे यांचे नावही जोडले गेले. यातूनच त्यांना आपले मंत्रीपद गमवावे लागले. तरी देखील धनंजय मुंडे यांना परळी नगरपरिषद नविडणुकीच्या निमित्ताने वाल्मिक कराड याची आठवण आली आणि ती त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
परळी नगर परिषदेच्या प्रचारासाठी परळीत आज एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात केवळ परळीत महायुती एकत्रितपणे लढत आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे याही सभेला उपस्थितीत होत्या. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात परळीची बदनामी, आपल्याला वर्षभरापासून झालेल्या त्रास, ज्यांना मदत केली तेच सहकारी साथ सोडून गेले याबद्दलची खदखद आपल्या भाषणातून व्यक्त केली. विरोधकांना औकात दाखवावी लागेल, असा इशारा देतानाच भाषणाच्या शेवटी वाल्मिक कराडची आठवण काढली. त्यांच्या या विधानानंतर आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, मला अभिमान वाटतो, उभ्या महाराष्ट्रात फक्त परळीत महायुती झाली. निवडणुका जशा खाली खाली येतात तेवढ्या त्या अडचणीच्या होतात. ज्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, त्यांच्याबद्दल हात जोडून दिलगिरी व्यक्त करतो. नाराज होऊ नका, महायुती तुमचा सन्मान योग्य पद्धतीने करेल. ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे, माझ्या, ताईंच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. परळीला गेल्या वर्षभरापासून बदनाम केलं त्यांना थोबाडात चोख उत्तर देण्याची ही संधी आहे.
भर निवडणुकीत उगाच काही करायची वेळ येऊ देऊ नका, असा सूचक इशाराही त्यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह महायुतीच्या पदाधिकार्यांना दिला. निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही. निवडणुक सोपी नाही. हलक्यात घेऊ नका. आम्ही कमी पडणार नाही, तुम्हीही कुठं कमी पडू नका. वर्षभरापासून मी काय सहन केलं मलाच माहित. एवढे वार होऊनही मी डगमगलो नाही. ज्यांनी ज्यांनी माझी मदत घेऊन दगा फटका केला त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. ‘ औकात मे लाडा पडेगा, कई तालाब अपनी हद भुले हुए है’ अशा शायरीतून त्यांनी विरोधकांना इशारा दिला.
उठसूठ परळीत यायचं आणि आरेाप करायचे. नांदर्याचं शेत तर स्मशान आहे, असं सांगितलं गेलं. हे काय आहे? असा उद्विग्न सवाल मुंडे यांनी केला. सेवा करत आलोय, बारा महिने चोवीस तास जगमित्र चालू होतं, आज नऊ-दहा महिने झाले काम सुरू आहे, कार्यालय सुरू आहे. हे बालेत असताना आपल्या सोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव सुद्धा होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकारी माणणारा म्हणून मला याची जाणीव करून द्यावी लागेल. काय चुकलं काय नाही? ते न्यायालय बघेल, पण सहकारी म्हणून ही जाणीव नक्कीच होते, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली.
जरांगे पाटील यांचा संताप: धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही, संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोर गरिबांचे मुडदे पाडणार्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणे, असे भयंकर पाप कराड करत होता, आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाहीत तुम्हीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला.
अंजली दमानिया संतापल्या : माझ्याकडे एकच शब्द आहे, थडक्लास माणूस’. सत्ताधारी पक्षाचे आमदार आरोपीबद्दल अशी सहानुभूती दाखवत असतील, तर खटल्यावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही दमानिया यांनी व्यक्त केली. हा खटला फास्ट ट्रॅक करण्याची गरज असताना ‘ तारीख पे तारीख’ सुरू असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुप्रीया सुळेंची थेट मागणी: देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपीची आठवण येईल किंवा त्यांना मदत केली असेल, तेव्हा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विनंम्र विनंती आहे की, अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, कारण हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे आणि एका क्रूर हत्येमागची नजर हटवण्याची असेल तर यांची विचारधारा काय आहे यावरच प्रश्नचिन्ह असल्याचे सुप्रीया सुळे म्हणाल्या.



Comments