नाना पटोले माझे मालक आहेत का?, घरवापसीबाबत कुठे बोललो - खासदार अशोक चव्हाण

नांदेड : काँग्रेस सोडलेल्या देशातील पाच माजी मुख्यमंत्र्यांची पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी होणार असल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या चर्चेत भाजपचे राज्यसभा खासदार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नवाचाही समावेश असल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. मात्र, या चर्चांवर अशोक चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसमध्ये परतण्याबाबत आपण कुठेही बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘ नाना पटोले काय माझे मालक आहेत का? मी घरवापसीबाबत कुठे बोललो आहे? याचा एक पुरावा दाखवा’ असे थेट आव्हान त्यांनी दिले.
काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याच्या चर्चेत महाराष्ट्रातील अशोक चव्हाण यांच्यासह पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांच्या नावाचीं चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चांमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्या संभाव्य घरवापसीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी महत्वाच्या काळात काँग्रेस सोडल्यामुळे राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याविषयी तीव्र रोष असल्याचे पटोले म्हणाले. तसेच, देशातील बदलत्या राजकीय वातावरणात अनेक नेते पुन्हा काँग्रेसच्या मूळ प्रवाहात येण्यास उत्सुक असल्याची चर्चा असली, तरी अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या संभाव्य घरवापसीबाबत अंतिम निर्णय पक्षाचे हायकमांड घेतील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले होते.
नाना पटोले यांच्या वक्तव्यावरप अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले, ‘ मी काँग्रेसमध्ये पतर येणार असल्याचे कधी बोललो आहे? एका पुरावा दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले ‘ नाना पटोले काय माझे मालक आहेत का? असा सवाल करत त्यांनी या चर्चांबाबत नाराजी व्यक्ती केली.
चव्हाण यांच्या या स्पष्ट प्रतिक्रियेमुळे त्यांच्या काँग्रेसमधील संभाव्य घरवापसीबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता यावर भाजपकडून कोणती भूमिका समोर येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Comments