नाशिकच्या पालकमंत्र्यांना प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेबांचा विसर! भाषणात नाव न घेतल्याने वनकर्मचारी महिलेचा संताप, अॅट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी; मंत्री गिरीश महाजनांकडून दिलगिरी
- Navnath Yewale
- Jan 26
- 2 min read

नाशिक: प्रजासत्ताक दिनाच्यानिमित्त नाशिकमध्ये आयोजित शासकीय ध्वजारोहण सभारंभात आज एक अनपेक्षित आणि खळबळजनक घटना घडली. जिल्हाचे पालमंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना. वनविभागातील एका महिला कर्मचार्याने थेट त्यांना जाब विचारात भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
माधवी जाधव असे या महिला कर्मचार्याचे नाव असून त्या वनविभागात कार्यरत आहेत. पालकमंत्र्यांचे भाषण ऐकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात नसल्याचे पाहून जाधव संतापल्या. त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकले. पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले असता, त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “मला कामावरून काढून टाकले तरी चालेल किंवा सस्पेंड केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. पालकमंत्र्यांनी ही चूक मान्य केलीच पाहिजे” असेही त्या ठणकावून म्हणाल्या.
आपली भूमिका मांडताना माधवी जाधव म्हणाल्या की, “ पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही फार मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेब ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी”
“ बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी येईल, याची मी वाट पाहत होते. पण बाबासाहेबांचं नाव भाषणात आलं नाही. लोकशाही आणि संविधानाला कारणीभूत नसलेल्या लोकांची नावं वारंवार घेण्यात आली. मग संविधानाचा आणि प्रजासत्ताक दिनाचा जो खरा मानकरी आहे, त्याचं नावं भाषणात का नाही”? असा सवाल देखील माधवी जाधव यांनी केला. दरम्यान, माधवी जाधव यांनी भरकार्यक्रमात गोंधळ घातल्याचे सांगत उपस्थित पोलिसांनी त्यांना बाजूला घेवून ताब्यात घेतले.
वनरक्षक माधवी जाधव यांचा व्हिडिओ सोसल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. सोशल मिडियावर माधवी जाधव यांच्या समर्थनार्थ कमेंट्सचा पाऊस सुरू झाला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही वनरक्षक माधवी जाधव यांनी केली. आंबेडकरी अनुयायांसह सामाजिक कार्यकर्ते, सामान्यांनी माधवी जाधव यांचे कौतुक करत मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपवर टीकेची झोड उठवली.
मंत्री गिरीश महाजनांची दिलगिरी: या घटनेनंतर सर्वस्तरातून टीकेची झोड उठल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले. “ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनावधानाने राहिले असेल. माझा तसा काही हेतू नव्हता. माझ्या मागील भाषण बघा कधीही असे झालेले नाही. यावेळी अनावधानाने झाल असेल. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो” असं गिरीश महाजन म्हणाले.



Comments