नाशिकनंतर नांदेडमध्ये भोंदूबाबाचा कांड: गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा, लग्नाचे अमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार; सन्यासी असल्याने लग्न करता येत नसल्याची बतावणी
- Navnath Yewale
- 3 days ago
- 2 min read

नांदेड: नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती आले आहेत. महिलेच्या फिर्यादीवरुन स्वयंघोषित ज्योतिष कॅप्टन खरातची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली असून त्याची कसून चौकशीत रोज नवनवे कांड समोर येत असतानाच आता नांदेड शहरातील एका नामाकिंत मठातील भोंदूबाबाने आपली शिष्य असलेल्या विधवा महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार जुलै 2025 पासून सुरू होता. नंतर मात्र संन्यासी असल्याचं सांगून लग्नाला नकार देत पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याची धमकीही दिली. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
पीडित महिलेचं (47 वर्षे) 12 वी पर्यंत शिक्षण झालं असून पतीचं निधन झाल्याने त्या तरोडा खु. भागात एका आपार्टमेंटमध्ये एकट्याच राहतात. आयुष्याच्या उतारवायात आध्यात्माकडे त्या वळल्या होत्या. परिसरातील इतर महिलांसोबत त्या 12 मे 2025 रोजी पोर्णिमेनिमित्त गाडीपूरा येथील प्रसिद्ध मठात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी महिलेची आरोपी संत हरीगिरी दत्तगिरी महाराज (38 वर्षे) याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर महिलेने जून महिन्यात संत हरिगिरी दत्तगिर महाराजला गुरू केलं.
त्यानंतर त्या दर गुरुवारी मठामध्ये गुरूच्या दर्शनासाठी जात होत्या. सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्या मठामध्येच महापुजेसाठी थांबत होत्या. त्यावेळी हरिगिर महाराज हा पिडितेशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ही बाब पीडितेच्या लक्षात आली नाही. नंतर त्याने मोबाईल नंबर घेवून आपला नंबर दिला. त्यावरुन रात्री उशिरापर्यंत अरिगिर महाराज हा पिडितेशी बोलत होता.
14 जुलै रोजी महिलेचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी हरिगिर याने घरी घेण्याचा अग्रह धरला. अखेर 16 जुलै रोजी ते महिलेच्या घरी आला. तिने हरिगिर याची पाद्यपूजा करीत अशिर्वादही घेतले बराच वेळ बसल्यानंतर त्यांनी महिलेकडे शरिरसुखाची मागणी केली. परंतु तिने विरोध केला. यावेळी जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर दोन वेळेस या भोंदूबाबाने अत्याचार केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपी भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
संन्यासी असल्याने लग्न करण्यास नकार : हरिगिर महाराज याने पिडिता ही विधवा असल्याची संधी साधून अत्याचार केल्यानंतर लग्नाचं आमिष दाखवलं होतं. परंतु नंतर मात्र संन्यासी असल्याने लग्न करता येत नाही असं म्हणत नकार दिला. तसेच वेळोवेळी पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक अशी धमकीही हरिगिरकडून देण्यात येत होती.



Comments