नितिश कुमार दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री, बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन
- Navnath Yewale
- Nov 20, 2025
- 2 min read
नवीन मंत्रीमंडळातील 26 मंत्र्यांनीही घेतली शपथ

पटणा: बिहारमध्ये आज नवीन एनडीए सरकार स्थापन झाले. पटनाच्या ऐतिहासिक गांधी मैदानामध्ये झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात जनता दल (संयुक्त) चे प्रमुख नितीश कुमार यांनी विक्रमी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी गोपनियतेची शपथ दिली.
नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या नवीन मंत्रिमंडळातील 26 मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 14 आणि जेडीयू कोट्यातील 8 मंत्र्यांचा सामावेश आहे. 26 मंत्र्यांमध्ये एक मुस्लिम आणि तीन महिलांचा समावेश आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेले तीन आमदाराही मंत्री झज्ञले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनीही या समारंभात मंत्रीपदाची शपथ घेतली.
पंप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि एनडीए शासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मोहण यादव, राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि गुजरातचे भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
गांधी मैदान सुंदरपणे सजवण्यात आले होते. समारंभाला हजारो जेडीयू, भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. व्यासपीठावरून ‘ पुन्हा एकदा बिहारमध्ये नितीश कुमार’ अशा घोषणा झाल्या. नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त, एनडीए सरकारच्या 26 मंत्र्यांनीही गांधी मैदानावर शपथ घेतली. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते सम्राट चौधरी आणि उपनेते विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांच्याव्यतिरिक्त भाजवचे मंगल पांडे, डॉ. दिलीप जयस्वाल, नितीन नवीन, रामपाल यादव, संजय सिंह, अरुण शंकर प्रसाद, सुरेंद्र मेहता, नारायण प्रसाद, रमा निषाद, लखेंद्र पासवान, श्रेयसी अणि डॉ. प्रमोद चंद्रवंशी यांनीही बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
त्याचबरोबर नितीश कुमार यांच्या समवेत जेडीयूच्या आठ मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, लेसी सिंग, मोहम्मद जामा खान, मदन साहनी आणि डॉ. प्रमोद कुमार यांचा समावेश आहे.
शिवाय चिराग पासवान यांच्या पक्षाचे संजय कुमार (पासवान) आणि संजय सिंह यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षातील संतोष कुमार आणि दीपक प्रकाश यांनीही नवीन सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली.
बिहारमध्ये नवीन एनडीए सरकार स्थापन झाले आहे. नितीश कुमार यांनी 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. नितिश यांनी पहिल्यांदा नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 2010,2015 (दोनवेळा) ,2017,2020,2022 (दोनवेळा) आणि 2024 मध्ये काम केले. आता त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा 10 वा कार्यकाळ सुरू केला आहे. ज्यामुळे ते बिहारचे सर्वात जास्त काळ सेवा करणार्या मुख्यमंत्र्यांपैकी एक बनले आहेत. अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए युतीने प्रचंड विजय मिळवत पुन्हा सत्तेत पुनरागमन केले. एनडीएने 202 जागा जिंकल्या, तर विरोधी महाआघाडीने 35 जागा जिंकल्या.



Comments