निवडणूकांच्या तोंडावर राज्यात नवी आघाडी!करुणा मुंडे सुप्रिया सुळेंच्या भेटीला
- Navnath Yewale
- Nov 11
- 2 min read

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदीच तोंडावर असताना करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी आज दि.11 (नोव्हेंबर) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेऊन राजकीय पाठींब्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेव घेत कोर्टात खटला दाखल केल्याचे सांगितले आहे.
राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोेंडावर सामाजिक, राजकीय कार्यकर्त्या करुणा मुंडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच आता करुणा मुंडे यांनी नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच्या भेटीचा तपशील जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवारांशी संबंधित वादांवर अत्यंत रोखठोक मते मांडली. पत्रकार परिषदेत माहिती देताना करूणा मुंडे म्हणाल्या की, आम्ही स्वराज्य शक्ती सेना या नावाने एक संघटना उभारली आहे. आम्ही निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने अत्यंत प्रयत्नशील आहोत. झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली. अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. पण आम्ही तयार आहोत.
परळीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करणार: यावेळी करुणा मुंडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने शेतकर्यांच्या प्रश्नांचा आणि राजकीय पाठिंब्याचा मुद्दा होता.शेतकर्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, याबद्दल मी त्यांच्याशी बोलले. सुप्रिया सुळे यांनी यावेळी आम्हाला स्पष्ट आश्वासन दिले आहे की, ‘जिथे जिथे तुम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे आम्ही करू आणि जिथे आम्हाला सपोर्ट लागेल, तिकडे तुम्ही सपोर्ट करा. याचा अर्थ स्वराज्य शक्ती सेेनेला एका मोठ्या पक्षाकडून सहकार्याचे संकेत मिळाले आहेत. मी स्वत: बीड जिल्ह्यातील परळीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा करेन, असे अवाहन करुणा मुंडे यांनी केले आहे.
करुणा मुंडे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यासोबतच त्यांनी दोन्ही रुपालींच्या वादावर भाष्य केलं. रुपाली चाकणकर यांना एवढा मोठा सपोर्ट मिळतो, तो काय रुप बघून दिला की काय बघून दिला, हे मला माहित नाही. पण महिलांसाठी त्यांचे काहीही काम नाही. तरीही त्यांना इतका मोठा पाठिंबा का दिला जातो हे कळत नाही. मी यापूर्वीच रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रीय महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. शिवाय त्यांच्यावर कोर्टात केस देखील केली आहे. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात महिला आयोगाने ठोस भूमिका घेतली नाही. मी सुप्रिया सुळेंना सांगितले आहे की, जोपर्यंत पीडित महिला डॉक्टरला न्याय मिळत नाही, तोवर शांत बसू नका.
दरम्यान, पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अजित पवारांशी संबंधित वादामुळे पूर्ण राष्ट्रवादीचीच इमेज खराब होत आहे. याचे परिणाम सर्व आमदार आणि खासदारांच्या प्रतिमेवर होत आहेत. हे सर्व कोण करत आहे, याचा तपास करावा लागेल. मुंबईत बसून एकजण हा सगळा राजकीय खेळ करत आहे, आणि तो महाराष्ट्राचा आका आहे, “ असा थेट आणि गंभीर आरोप त्यांनी केला. ज्यामुळे अनेक राजकीय तर्क वितर्कांना वाव मिळत आहे.



Comments