top of page

महापालिका निवडणुका जाहीर होताच महायुतीवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

ree

मुंबई: मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा अखेर आज जाहीर झाल्या. राज्यातील सर्व 29 पालिकांच्या निवडणुका एकाच वेळी पार पडणार असून 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकालाची घोषणा होईल. दरम्यान, निवडणुका जाहीर होताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे.जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल असं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसंदर्भातही मोठी घोषणा केली आहे.


पुण्यात कदाचीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल असं त्यांनी जाहीर केलं आहे. तसंच शिवसेना शक्यतो सर्व ठिकाणी आमच्यासोबत असेल असंही त्यांनी स्पष्ठ केलं. “ आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल. तर काही ठिकाणी भाजपा- राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल. पुण्यात मात्र अजित पवारांची, आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्ष पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असं असलं तरी ही मैत्रिपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल’ असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, नागपूर, आणि चंद्रपूर महापालिकेत आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलं आहे.पण सुप्रीम कोर्टानेच निवडणुका घ्या असं सांगितलं आहे. फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहील. आम्ही जो अंतिम निर्णय घेऊ तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल’


राज्य निवडणुक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा मला आनंद आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणं हे लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे या संस्था दिर्घकाळ निर्वाचित प्रतिनिधिंशिवाय होत्या. आता पुन्हा निवडणुक होत आहेत. आमच्या शासनाने केलेलं काम पाहता कौल आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

ठाकरे बंधूच्या युतीवर बोलतान फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधूंचीयुती झाल्यानंतर आमच्यावर काही फरक पडणार नाही, “ दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी काँग्रेस सोबत गेली तरी मुंबईकर आमच्या महायुतीलाच निवडून देतील. आमचा कारभार, आम्ही केलेला विकास आणि मराठी माणसाचं जोपासलेलं हित सामान्य मुंबईकरांनी पाहिलं असल्याने ते आमच्यासोबत राहतील” असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Comments


bottom of page