नेपाळमध्ये महाराष्ट्राचे 100 पर्यटक आडकले!
- Navnath Yewale
- Sep 10
- 1 min read

बोकाळलेला भ्रष्टाचार आणि हुकूमशाही कारभार यामुळं सरकारविरोधात संतापाची लाट उसळली. याच लाटेचा तडाखा नेपाळमधील सरकारला जोरदार बसला. सोशल मीडिया बंदीच्या निर्णयानं तरुणाईचा भडका उडाला. या भडक्यात नेपाळच्या सत्तापालट झालं. संसद भवनापासून देशातील महत्वाच्या इमारती पेटवून देण्यात आल्या. तरुणाईनं अनेक ठिकाणी तोडफोड केली. काही राजकीय नेत्यांनाही मारहाण केल्याच्या घटना घडल्या. नेपाळमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात अनेक जणांचा बळी गेला आहे. याच हिंसाचारग्रस्त नेपाळमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 पर्यटक अडकले आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, लातूर आणि कोल्हापुरातील हे सर्व पर्यटक असल्याचे समजते.
ठाण्यातील मुरबाडमधील सर्वाधिक पर्यटक आहेत, अशी माहिती समजते. दुसरीकडं केंद्र सरकारने नेपाळमधील भारतीयांसाठी अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. आता राज्य सरकारने या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. महाराष्ट्रातील आपल्या लोकांना मायदेशात आणण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. कुणीही घाबरू जाऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील हे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तेथील संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलणं झालं आहे. दुतावासाच्याही संपर्कात आहोत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी जी पावलं उचणे गरजेचे आहे, ती उचलली जात आहेत. असे योगेश कदम म्हणाले.



Comments