पडद्यामागे पुन्हा ‘प्लनिंग’ सुरू झाली; एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणारे एकदम शांत कसे?- जरांगे पाटील

जालना: जरांगे पाटील यांनी माध्यमांसमोर सादर केलेल्या ऑडिओ क्लिपचे राज्याच्या राजकरणात तीव्र पडसाद उमटल. सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षातील नेत्यांनी आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या. मात्र काल सायंकाळपासून दोन्ही पक्षातील नेते याबाबत चिडीचूप झाल्याने जरांगे पाटील यांनी यावर गंभीर आणि धक्कादायक दावे केले आहेत. जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.25) पत्रकार परिषदेतून खळबळजनक दावा केला आहे.
आडिओ क्लिप प्रकरणी कालपर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षातील नेते एकाएकी गप्प का झाले? असा प्रश्न उपस्थित करत पडद्यामागे पुन्हा ‘प्लनिंग’ सुरु झाल्याची कुजबूज आमच्यापर्यंत आल्याचा दावा जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ऑडिओ क्लिप खरी आहे हे मी दाव्यानिशी सांगतो. त्या ऑडिओ क्लिपमागील सत्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुलाचे नांव आल्याने समोर आणले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परस्पर हे डाव आखले गेले असतील तर त्यांनी याच्या मुळाशी जाऊन सत्य जनतेसमोर आणायला हवं. जर त्यांना या बाबत माहिती असेल तर यामध्ये फडणवीस सहभागी आहेत? असं आम्ही समजायचं का?
कालपर्यंत एकमेकांवर आगपाखड करणारे एकाएकी शांत कसे? याचीही माहिती आमच्यापर्यंत आली आहे, पण पुरावे आल्याशिवाय बोलणार नाही. “ आपल्याला सत्तेत राहायचं आहे, काही करून ही क्लिप खोटी आहे असं आपल्याला साबित करावच लागणार आहे. अन्यथा जनता आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही” असा कट शिजत असल्याचा अरोप जरांगे पाटील यांनी केला.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मला खात्री आहे शिंदे साहेब शांत बसणार नाहीत, कारण यामध्ये त्यांच्या मुलाचं नांव आलं आहे. फडणवीस साहेब ही याच्या मुळात गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांच्या परस्पर कट रचून त्या 5 ते 7 जणांचा (क्लिपमधील संवाद असलेल्या) प्लॅन, हेतू काय होता? मला पैसे दिले म्हणायचं आणि मराठा आंदोलन चिरडायचं, शिंदे साहेबांच्या मुलाच्या हातून दिले म्हणून शिंदे साहेबांना संपवायचं आणि फडणवीस यांना मराठ्यांपासून तोडायचं असा काही प्लॅन होता का? हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे.
कालपर्यंत सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप सुरू होते याचा अर्थ ही क्लिप खरी आहे हे सांगण्यासाठी वेगळ सांगायची गरज नाही. आणि जनता एवढी दुधखुळी नाही. मात्र आज एकदम दोन्ही पक्षातील नेते शांत का? म्हणजेच ही खर्या क्लिपला खोट सिद्ध करायचं आहे. एकमेकांवर बोलू नका ‘दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ नको’ अशी शक्कल लढवत जनतेला उत्तरं द्यावी लागतील या भितीने क्लिपच खोटी ठरवायचं षडयंत्र सुरू झालं आहे असा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऑडिओ क्लिपच्या मुळाशी जावून खरा प्रकार जनतेसमोर आणून ती चांडाळ चौकडी कोण?, फडणवीस साहेबांना हे माहिती नसेल तर त्यांच्या पाठिमागे कट रचणारांना जनतेसमोर आणावे, आणि जर त्यांना हे माहिती जरी असलं तरी आमचे लोक असून सुद्धा त्यांच्यावर मी कारवई केली असे सिद्ध करून जनतेची मनं जिकांवी अन्यथा माझ्याकडं आणखी खूप आहे ते मी बाहेर काढल्यानंतर मला म्हणून नाका असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.



Comments