10 हजाराच्या वसुलीसाठी शेतकर्याला घरातून उचललं; दोन दिवसांनी फायनान्स ऑफिसमध्ये आढळला मृतदेह , गळफास दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

नांदेड: एकीकडे सरकार शेतकर्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देत आहे. मात्र, दुसरीकडे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांकडून कर्जवसुली केली जात असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
अशातच आता नांदेडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी एक शेतकर्याला फायनांन्स कंपनीच्या लोकांची थेट गावातून उचलून नेले. अवघ्या 10 हजर रुपयसांच्या कर्जासाठी एका शेतकर्याला फायनान्स कंपनीच्या लोकांनी थेट गावातून उचलून नेले. त्यानंतर या शेतकर्याच्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या शेतकर्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला असून, ही हत्या असल्याचा आणि ती फायनान्स कंपनीच्या लोकांनी केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील चंद्रकांत शिंदे यांनी मागील महिन्यात एका खासगी फायनान्स कंपनीकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रत्यक्षात मात्र, व्याज कापून त्यांना केवळ सात हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर दुष्काळामुळे हतबल झालेल्या शिंदे यांना कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. त्यामुळे वसुलीच्या नावाखाली फायनान्स कंपनीच्या लोकांनी गुरुवारी चंद्रकांत शिंदे यांना थेट गावातून उचलून आपल्या कार्यालयात नेले.
यावेळी 10 हजार रुपयांच्या कर्जापोटी त्यांच्याकडे तब्बल 70 हजार रुपयांची मागणी करत त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय, फायनान्स कंपनीचे लोक पैसे मिळाल्यावर त्यांना सोडून देतील, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, दोन दिवसांनंतर शिंदे यांचा मृतदेह चिखलवाडी रस्त्यावरील खालसा फायनान्सच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
मात्र, ही आत्महत्या नसून कर्जाच्या पैशांसाठी फायनान्स कंपनीच्यसा चालकाने आणि कर्मचार्यांनी चंद्रकांत शिंदे यांची हत्या करून त्यांना गळफास घेतल्याचे भासवल्याचा गंभीर आरोप मृत शेतकर्याची आई सर्जाबाई शिंदे आणि मुलगी रुपाली शिंदे यांनी केला आहेे.
या घटनेमुळे आता नांदेडसह महाराष्ट्र हादरुन गेला आहे. अवघ्या दहा हजार रुपयांसाठी एक शेतकर्याला जीव गमवावा लागल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, ‘ कर्जासाठी फायनान्स कंपनीच्यसा लोकांनी माझ्या वडिलांना गावातून उचलून नेले आणि त्यांचा घात केला. माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी मृत शेतकर्याच्या मुलीने केली आहे.



Comments