top of page

फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे, अपटावेच लागणार- जरांगे पाटील

अकलूज: देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. भाजपने तीन राज्यात स्पष्ट बहुमत सरकार स्थापन होईल, एवढे संख्याबळ मिळवले आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने द्विशतक ठोकत ममता दिदींच्या 15 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. भाजपने मोठ्या फरकाने बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, विरोधकांनी देखील भाजपच्या विजयावर एसआयआर, ईडी, सीबीआय, निवडणुक आयोग, न्यायव्यवस्थांसारख्या संस्थांचा वापर करून मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपवर विजयाची शंका उपस्थित केली आहे. त्याचबरोबर राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरूनही संताप व्यक्त करत फडणवीसांचे सरकार आपटावेच लागेल असं जरांगे पाटील म्हणाले.


अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांच्या आईच्या मृत्यूनंतर जरांगे पाटील यांनी रात्री त्यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशी बोलताना फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. सध्या राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ‘ हे असले रत्न आपल्याला लाभले आहेत, हे गुंडांना जेलमध्ये एसी लावून देतात आणि मोबाईल फोन देतात. यांच्या काळात गुंडांचे चालणार आहे. फडणवीसांचे सरकार राक्षसी वृत्तीचे असून आता ते आपटावेच लागेल, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.


ज्याला विचारले ते म्हणतो मी यांना मतदान केले नाही, तरी हे जिंकतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बाईला पाडले, पण लोक म्हणतात ममताबाई कधीच पडणार नाही. मला पहिल्यांदा वाटायचं काही नसेल पण आता नक्की काहीतरी भानगड आहे, त्यांनी कुठेतरी काड्या खोचून ठेवल्या आहेत, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल आणि इतर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या विजयावर प्रश्न उपस्थित केला.


पाच राज्याच्या निवडणुक निकालामध्ये भाजपने आसाम, पुद्दुचेरीत सत्ता कायम राखली तर पश्चिम बंगालमध्ये महापरिवर्तन घडवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपच्या या विजयानंतर काँग्रेसनेते राहुल गांधी, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती, यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या विजयावर शंका उपस्थित केली आहे.

Comments


bottom of page