बांगलादेशात पुन्हा अराजकता, संसदेवर कट्टरपंथियांचा हल्ला परिस्थिती ‘आऊट ऑफ कंट्रोल’
- Navnath Yewale
- Dec 20, 2025
- 2 min read

बांगलादेशात अराजकता शिगेला पोहोचली असून कट्टरपंथीयांनी संसदेत घुसून तोडफोड केली आहे. तर दुसरीकउे एका हिंदू तरुणाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. युनूस सरकारने दंगलखोरांना रान मोकळे करून दिल्याने भारताच्या पूर्व सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असून भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे.
बांगलादेशात अराजकता माजली आहे. भारतविरोधी कट्टरपंथी नेता शरीफ उस्मान हादी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या जमावाने अचानक संसदेवर धावा बोलला. संतप्त जमावाने संसदेत घुसून मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि लूटपाट केली आहे.
हिंसाचारापूर्वी हादीचा मृतदेह बांगलादेशचे राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या बरीजवळ दफन करण्यात आला. दुपारी 2:30 वाजता संसद भवनाच्या साऊथ प्लाझामध्ये अंत्यविधीची नमाज (जनाजा) अदा करण्यात आली. यावेळी ‘इंकलाब मंच’ चे सदस्य सचिव अब्दुल्ला अल जाबेर यांनी समर्थकांना निदर्शनासाठी शाहबाग येथे जमण्याचे आवाहन केले. आम्ही इथे शोक मनवायला आलो नाही, तर न्याय मागायला आलो आहोत, असे म्हणत त्यांनी सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे.
अंत्यविधीनंतर अंतिरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी भाषण केले. ते म्हणाले, हादी आमच्या ह्रदयात बसला आहे. जोपर्यंत बांगलादेश अस्तित्वात राहील, तोपर्यंत प्रत्येका बांगलादेशींच्या मनात तो जिवंत राहील. त्याला कोणीही पुसू शकणार नाही. युनूस यांच्या या भाषणाने कट्टरपंथियांना अधिक बळ मिळाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या विशेष माहितीनुसार, युनूस सरकारने जाणीवपूर्वक दंगलखोरांना रान मोकळे करून दिले होते. संसदेत तोडफोड सुरू असताना दोन तास तिथे पोलिस किंवा लष्कराला पाठवण्यात आले नाही. यामागे 12 फेब्रूवारीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा काट असल्याचे समोर येत आहे. अवामी लीगवर बंदी आहे आणि बीएनपीचे नेते तारिक रहमान 25 डिसेंबरला लंडनहून परतत आहेत. अशा स्थितीत अराजकता माजवून जमात-ए-इस्लामीला बळ दिल्यास युनूस यांना पुन्हा राष्ट्रपती होण्याची संधी मिळू शकते, असे राजकीय गणित मांडले जात आहे.
दरम्यान बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदुवरील अत्याचार थांबताना दिसत नाहीत. मयमनसिंह शहरात 25 वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदु तरुणावर ‘ ईशनिंदा’ केल्याचा खोटा आरोप लावून जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा मृतदेह झाडला लटवून जाळून टाकण्यात आला. या प्रकरणी रॅपिड अॅक्शन बटालियनने 19 ते 46 वर्षे वयोगटातील सात संशयितांना अटक केली आहे.
बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता भारताने कडक पावले उचलली आहेत. दरम्यान, इंकलाब मंच आणि जमातच्या कट्टरपंथियांनी बेनापोलपासून भारतीय सीमेपर्यंत मोर्चा काढला असून शेख हसीना यांना बांगलादेशाच्या हवाली करण्याची मागणी केली आहे. कट्टरपंथियांनी चटगावमधील प्रसिद्ध चंद्रनाथ मंदिराबाहेर धार्मिक घोषणाबाजी केली. भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल आर. सी. तिवारी यांनी गुरुवारी भारत- बांगलादेश सीमेचा दौरा केला. भारतीय सैन्य सीमेवरील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं ते म्हणाले.



Comments