बिबट्याची दहशत आणि प्रशासनाचे अपयश! स्वसरंक्षणासाठी महिलांचा अभिनव उपक्रम ठरतोय धैर्याचे प्रतिक
- Navnath Yewale
- Nov 9, 2025
- 2 min read

पुणे: उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग बिबट्याच्या हालचालींमुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिरूर, आळेफाटा, जुन्नर, मंचर परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विशेष: सकाळी आणि सायंकाळी शेतात काम करणार्या महिलांना आपला जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील महिलांनी स्वसंरक्षणासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
गावातील महिलांनी बिबट्याच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आपल्या गळ्यात टोकदार खिळे असलेले पट्टे घालायला सुरुवात केली आहे. हा पट्टा लोखंडी किंवा जाड रबराच्या पट्टीसारखा असून त्यावर छोट्या-छोट्या टोकदार खिळ्यांचा थर बसवण्यात आला आहे. बिबट्या प्रामुख्याने मानेवर झडप घालून हल्ला करतो, त्यामुळे जर गळ्यात असा पट्टा असेल तर तो हल्ला निष्फळ ठरू शकतो, असा महिलांचा समज आहे. ही कल्पना त्यांनी गावातील काही तरुणांसोबत चर्चेतून प्रत्यक्षात आणली असून सध्या गावातील अनेक महिला हा ‘खिळ्याचा पट्आ ’ वापरत आहेत.
महिला म्हणतात: आम्ही रोज शेतात जातो, बिबट्याची भीती सतत वाटते, मग विचार केला की काहीतरी उपाय करायला हवा. प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत, त्यामुळे आम्ही हा पट्टा तयार केल्याचे पिंपरखेडच्या एका महिलेने सांगितलं. आमच्यासमोर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्यावेळी जीव वाचवणार्या कुत्र्याचा संघर्ष आम्ही पाहिला होता. बिबट्याने कुत्र्याची मान पकडण्याचा प्रयत्न केला पण खिळ्यांमुळे आमचा कुत्रा वाचला. आम्ही गवत खुरपताना कधी बिबट्या मागून हल्ला करेल याचा नेम नाही, म्हणून आम्ही गळ्याला पट्टा बांधल्याचेही महिला म्हणाल्या.
ग्रामीण भागात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये अजूनही भीती कायम आहे. त्यामुळे महिलांचा हा ‘ खिळ्यांचा पट्टा’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. काहीजण त्याला स्वसंरक्षणाची जुगाड कल्पना मानतायत, तर काहींनी यामध्ये धोका असल्याचंही मत व्यक्त केलं आहे. शेतात काम करतानाही सुरक्षित राहण्यासाठी महिलांनी राबवलेला हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठरत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांपासून स्वत:चं रक्षण करण्याचा हा नवाच ‘महिला उपाय’ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



Comments