top of page

बीड हादरले: गेवराईत 20 वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

बीड: लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न पाहणार्‍या बीडच्या लेकीने टोकाचं पाऊल उचलत जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. बीड च्या गेवराई शहरातील 20 वर्षीय नवविवाहित महिला पूजा प्रमोद सुरवसे हिने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरकडील नातेवाईकांनी पती, सासू- सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी व पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


या अधिक माहिती अशी की, गेवराई शहरात पतीसोबत राहणार्‍या पूजा प्रमोद सुरवसे हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तिचा संपर्क माहेरच्या नातेवाईकांशी झाला होता. मात्र, काही वेळानंतर तिच्या वडिलांना फोन करून पूजाने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रूग्णालयात धाव घेतली. तेथे त्यांना पूजाचा मृतदेह आढळून आला.

मृत पूजा सरवसे हिच्या भावाने गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे , सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे हे वारंवार बिझनेसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत होते. या मागणीसाठी पूजाचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सतत होत असलेल्या त्रासामुळे आणि छळामुळे पूजा खचली होती. अखेर या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा अरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतर दोषी ,आढळणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती तपास अधकिरी संजय उदगीरकर यांनी दिली. दरम्यान सुशिक्षित महाष्ट्रात अशा किती पूजांचा बळी हुंड्यासाठी जाणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत जात आहे.

Comments


bottom of page