top of page

मुंबईतील शालिमार आणि नूर मोहोम्मद हॉटेलच्या किचनमध्ये अस्वच्छता तुकाराम मुंढेची भेंडीबाजारात मोठी कारवाई; हॉटेलचे परवाने रद्द, आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्‍या कारखान्यांवर छापा

मुंबई: राज्यभरात प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम राबवणार्‍या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्ंघन करणार्‍या हॉटेल- रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईसाठी मोठी चर्चा सुरू झाली आहे.


अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत राज्यातील अनेक हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने अस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. अमरावतीतील एका हॉटेलला बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.


या हॉटेलचा परवाना रद्द : भेंडी बाजारातील शालिमार हॉस्पिटॅलिटीचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सुधारणा नोटीस देऊनही पुनर्तपासणीत 25 गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच भेंडी बाजारातील नूर मोहम्मदी हॉटेलचाही परवाना रद्द करण्यात आला आहे. स्वयंपाकघरात अस्वच्छता, तेलाचे जाड थर, कीटकांचा मुक्त प्रवेश आढळला होता. कच्चा मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदीचा अभाव, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसल्याचे उघड झाले. उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.


व्यवसाय बंदची नोटीस: अन्न साठवणुकीची अपुरी व्यवस्था, गंजलेली उपकरणे आणि निकृष्ट स्वच्छता, अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदी नसल्याचे यावेळी आढळले. अमरावतीतील अमरावती दरबार हॉटेलवरही एफडीए ने कारवाई केली आहे. वैध अन्न परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याने तत्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे.


आहिल्यानगरमध्ये मावा बनवणार्‍या कारखान्यांवर छापा :

आहिल्यानगर शहरातील तपोवन रस्ता, सूर्यनगर परिसरात घरातून अवैधरित्या मावा तयार करून त्याची विक्री करणार्‍या दोन ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी पहाटे कारवई केली. या कारवाईत सुमारे 99 हजार 700 रुपयांचा सुगंधीत तंबाखू, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इेलक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाईच्या सूचना पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार पोलिस निरिक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप दरवडे यांच्यासह आंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, मनोज साखरे, सतीश भवर, भगवान धुळे, भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने ही कारवर्इा केली. पथकाला माहिती मिळाली होती की, तपोवन रस्त्यालगतच्या सूर्यनगर येथील एस.टी. कॉलनी परिसरात सचिन दिलीप पवार (वय 40) आणि राहुल नवनाथ गिते (वय 30) हे त्यांच्या राहत्या घरात मशीनच्या साहाय्याने विक्रीस प्रतिबंधित असलेला मावा तयार करून विक्री करत आहेत. या माहितीची खातरजमा करून पथकाने दोन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला.


छाप्यादरम्यान दोघेही मावा तयार करताना अढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुगंधित तंबाखू व सूपारी मिश्रित मावा, तयार मावा, बारीक सुपारी, मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक व लोखंडी मशीन तसेच प्लास्टिकच्या पुड्या असा एकूण 99 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

Comments


bottom of page