top of page

बीडच्या फुलसांगवीत बीबट्याने पाडला घोडा, मेंढीचा फडशा!

ree

बीड: मेंढ्या चारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळांच्या जागलीवर शनिवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने घोडा आणि एका मेंढीची शिकार केल्याची घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी शिवारात मार्कडवारी जवळ घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फुलसांगवी शिवारामध्ये मार्कडवाडी जवळ सुभाष भुजंगराव ढाकणे यांच्या (गटनंबर 163) शेतात बिगवण येथील मेंढपाळांनी मेंढ्यांचा कळप बसवला होता. मेंढ्याच्या कळपाजवळच जागल मांडली. रविवारी मध्यरात्री साधारण 1:30 च्या सुमारास मेंढपाळाच्या जागलीवर बिबट्याने हल्ला चढवला. मेंढपाळाच्या सामानाची वाहतूक करणार्‍या घोड्याची व एका मेंढीची शिकार केली आहे.


घोड्याच्या नरड्याचा चावा घेऊन त्याला गतप्राण केले व त्याचे पाटाजवळचे मांस भक्षण करून त्या ठिकाणाहून बिबट्या पसार झाल्याचे मेंढपाळाने सांगितले. घटनेची माहिती पाटोदा वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली. सकाळी वन विभागाचे कर्मचारी घटनस्थळावर दाखल झाले. घटनेचा पंचनाम करण्यात आला त्यानुसार सुमारे 75,000 रुपयांचा घोडा व 20,000 रुपयांची मेंढी असा एकून एक लाख रुपये किमतीचे पशुधन बिबट्याच्या भक्षस्थानी ठरले आहे. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे फुलसांगवी, हाजीपूर, गाजीपूर, मार्कडवाडी, धारवंटा, शिरापूर (गात), कमळेश्वर धानोरा, साक्षळपिंप्री, तरडगव्हान (भोसले), आर्वी, जांब परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


सध्या रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी सोडण्याची सुगी असल्याने शेतकरी बिबट्याच्या दहशतीने मशागतीच्या कामात सरसावत नाहीत, दरम्यान फुलसांगवी शिवारात पहिल्यांदाच बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आल्याने परिसरातील शेतकरीवर्ग पुरता धास्तावला आहे. त्यामुळे खरिप व रब्बी हंगामातील शेती कामाला मोठी खिळ बसली आहे. दरम्यान, या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पर्यायी उपाय योजना राबवून परिसर भयमुक्त करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

Comments


bottom of page