बीडच्या वारणीत दोन गटात राडा; परपस्पर विरोधात शिरुर पोलिसात गुन्हे दाखलअतिरिक्त पोलिस बंदोबस्त, पोलिसांचा फौजफाटा; गावात तणावपूर्ण शांतता
- Navnath Yewale
- Apr 19
- 2 min read

बीड: बीडच्या वारणी गावात काल शनिवारी (दि.18) वार्षीक साप्ताहाची सांगता होती. साप्तहा निमित्त ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांच्या गर्दीने गावात भक्तीमय वातावरण होते. साप्ताहाच्या सांगता सोहळ्यानंतर अवघ्या काही तासात किरकोळ कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी शिरुर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये अॅट्रॉसीटी अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हांचाही समावेश असून पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशान्वये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे, गावात तणावपूर्ण शांतता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वारणी येथील विष्णू केदार गावच्या वार्षीक साप्ताहाच्या समारोपानंतर घराकडे जात होते. अशात गावातील काही ओळखीचे लोक एका पांढर्या रंगाच्या स्कार्पीओमधून जात असतांना केदार यांनी ‘तुम्ही कोठे जात आहत?’ अशी विचारणा केली. त्यावर ‘ तुला काय करायचे? असे म्हणत विष्णू केदार यांना वाहनातील लोकांनी धक्का बुक्की करत “ तुमच्या गाववाल्याची काय औकात आहे तुम्हाला संध्याकाळपर्यंत दाखवतो” असे म्हणत ते वारणी फाट्याच्या दिशेने निघून गेले. घडलेला प्रकार विष्णू केदार यांनी तात्काळ सरपंच पती अविनाश केदार यांना सांगितला. मात्र, काही वेळातच मारेकर्यांनी 50 ते 60 सहार्यांसोबत हातात लोखंडी रॉड, गलोल (दगड मारण्याचे, शिकारीचे साधन) घेवून विष्णू केदार यांच्यासह त्यांच्यासोबत अशोक केदार, संदीप बडे अविनाश गिते, अविनाश केदार, अजिनाथ केदार यांच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉड, मिरची पुड, दगडाने जबर हल्ला चढवून जखमी केले. यावरुन संदीप बर्डे, विनोद बर्डे, गणेश गायकवाड, भारत फुलमाळी, दिलीप फुलमाळी, आदित्य धनवई, तुषार कानडे, सोमनाथ मोरे, आसिफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसर्या गटाकडून गावातील जयसिंग केदार, मल्हारी केदार हे आम्ही आमच्या घराकडे जात असताना आमच्याकडे आले आणि जयसिंग केदार याने जातिवाचक शिवीगाळ करत “तुम्हा भिलट्यांची आमच्या गावात यायची लायकी नाही,निघा इथून ” असे म्हणत मला माझ्या भावास लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. या प्रकारानंतर गावातील काही लोकांनी भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेतले. मात्र, पुन्हा जयसिंग केदार, मल्हारी केदार, चंद्रकांत केदार, अविनाश केदार, निवृत्ती केदार, सचिन केदार व इतर अनोळखी 10 ते 15 जणांनी जातिवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्यांसह चाकु, लाकडी दांडके, दगड- गोट्यांनी जबर मारहाण केल्याप्रकरणी अॅट्रॉसीटी कायद्यान्वये विविध कलमांतर्गत शिरुर कासार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुरे, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक धनंजय कुलकर्णी तपास करीत आहेत.
दरम्यान, बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशान्वये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे अफवांवर विश्वास ठेवू नये परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात असून शिरुर पोलिसांच्या दक्षतेसह तत्परता आणि सामंजस्यामुळे गावात शांतता आहे.



Comments