top of page

बीडमधील त्या रक्तरंजीत हत्याकांडाचे गुड उलगडले; बालपणीच्या भांडणाचा बदला, तारुण्यात जीवानिशी घेतला !

बीड: शहरातील अंकुशनगर भागात मंगळवारी (दि.6) भरदुपारी नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे याच्या निर्घुण हत्येने संपूर्ण शहर हादरले होते. नळ दूरुस्तीचं काम करणार्‍या हर्षद शिंदेवर पिस्टलमधून प्रथम गोळ्या झाडण्यात आल्या, नेम चुकल्याने हर्षदने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, आरोपीने त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले यातच हर्षदचा जागेवरच मृत्यू झाला. या थरारक हत्याकांडामागचं कारण अखेर समोर आलं आहे.


नगरपालिका कंत्राटी कर्मचारी हर्षद शिंदे (वय 38) याच्या हत्याकांडाचे गुड अखेर बीड पोलिसांनी उलगडले आहे. मुख्य आरोपी विशाल सूर्यवंशी पोलिस कोठडीत आहे. बालपणी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी आपण हर्षदचा काटा काढल्याची कबुली आरोपीनं दिली आहे.


दिवसाढवळ्या, भरदुपारी हर्षद शिंदेची निर्घुण हत्ये जिल्हाभरात खळबळ उडाली होती. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रतिक्रिया उमटल्या, शिवाय सोशल मिडियावर बीडमधील सुरक्षेविषयी कमेंटचा पाऊस पडत होता. वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर अरोपी पिस्टल मधून गोळ्या झाडून, पाठलाग करत धारदार शस्त्राने निर्घुण हत्या घडवून आणतो. आरोपीच्या क्रूरतेसह त्याच्या मस्तवाल हिमतीवरही यंत्रणेकडे बोट दाखवत प्रतिक्रिया उमटल्या. सुरुवातीला हा काही अनैतिक संबंधातून घडलेला प्रकार असावा?, कौटूंबीक कारण असु शकते? असे अनेक प्रश्नांच्या बाजूने तर्क लावण्यात येत होते. मात्र, या तर्क वितर्कास पोलिस तपासातूनच पूर्णविराम मिळणार होता. घटनेचे गांभीर्य राखून पोलिस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या मार्गर्शनाखाली तात्काळ आरोपीच्या शोधार्थ बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शिवाजीनगर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले होते.



रविवारी (दि.11 जानेवारी) शिवाजीनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून विशाल सुर्यवंशी यास ताब्यात घेतले. आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर मा. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिस तपासातून हर्षद शिंदेच्या हत्याकांडाचे गुड उलगडले. लहानपणीच्या भांडणाचा राग मनात साठल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याचे पोलिस निरिक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी सांगितले.


दरम्यान, अंकुशनगर भागात पाईपलाईनचे काम करत असलेल्या हर्षद शिंदे याच्यावर भरदुपारी विशाल सुर्यवंशी याने गोळ्या झाडल्या. मात्र, त्या गोळ्या हर्षदला न लागल्यामुळे त्याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्राने वार करत आरोपीने त्याची हत्या केली होती. भारदुपारी घडलेल्या या रक्तरंजित राड्यामुळे मोठी खळबळ उडाली होती घटनेनंतर विशाल उर्फ बप्प्या सुर्यवंशीने पळ काढला. बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शिवाजीनगर पोलिस त्याच्या मागावर होते.


चार दिवसांच्या मोहिमेनंतर पोलिसांनी रविवारी केजकडे येत असताना आरेापीला दुचाकीसह ताब्यात घेतलं. दरम्यान रविवारी (12 जानेवारी) आरोपीला कोर्टात हज केले त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


पोलिस तपासातून आता विशाल सुर्यवंशी हर्षदला जीवे मारण्यामागे लहानपणीचे भांडण कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. लहानपणीच्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल 15 ते 20 वर्षानंतर त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस निरिक्षक प्रवीणकुमार बांगर हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


दारुच्या नशेत होता आरोपी : आरोपी विशाल उर्फ बप्प्या सुर्यवंशी घटनेच्यादिवशी दारूच्या नशेत होता. हर्षदला घरासमोर काम करताना पाहिल्यानंतर त्याला बालपणीच्या भांडणाची आठवण झाली. जुन्या आठवणी नशेत ताज्या झाल्यानंतर त्याने पिस्टल सोबत घेत हर्षदवर आधी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्यामुळे त्याचा पाठलाग करून धारदार शस्ताने त्याच्यावर सपासप वार केले. कधीकाळी बालवयात झालेले भांडणं जीवावर उठल्याने पोलिसांसह सामान्यांना देखील याचे अश्चर्य व्यक्त होत आहे.

Comments


bottom of page