top of page

बीडमध्ये राष्ट्रवादीचा ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’, आमदार रोहित पवारांचा सरकारला अल्टीमेट, .. अन्यथा समृद्धी महामार्ग बंद पाडू; एकही गाडी फिरु देणार नाहीत!

5 hours ago
2 min read

बीड: पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत, गावखेड्यांसह वाडी वस्ती तांड्यांवर भिषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावराच्या चारा-पण्याचा प्रश्न गंभीर आहे. तात्काळ दुष्काळ जाहीर करून उपाय योजना लागू कराव्यात, गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईसह शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये, शेतमजुरांना 25 हजार रुपये मदत जाहीर करावी यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात बीडमध्ये आज शेतकरी आक्रोकश मोर्चा काढण्यात आला.शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारे फलक घेत मोर्चेकर्‍यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात गुरुवारी (दि.24) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. आमदार संदिप क्षिरसारगर, राष्ट्रवादी युवतीच्या सक्षणा सलगर, माजी आमदार सय्यद सलिम, उषा दराडे, संजय वाघचौरे, रविकांत वरपे यांच्यासह हेमा पिंपळे, जगन्नाथ काकडे, पंकज बोराडे यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार संदिप क्षिरसागर यांनी तात्काळ दुष्काळी उपाय योजना लागू करण्यासह विकास निधी शेतकर्‍यांच्या हितासाठी वापरा, जनावरांच्या चारा पाण्यासह शेतकर्‍यांना भरीव मदतीची मागणी केली. प्रमुख उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात दुष्काळाची भिषणता आणि शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. मायबाप सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना दुष्काळी उपाय योजनांचा आधार देण्याची मागणी केली.


अमादार रोहित पवार यांनी मराठवाड्यातील भिषण दुष्काळाचे वास्तव मांडताना नुकसानीची आकडेवारीच मांडली. मराठवाड्यासह राज्यात दुष्काळी उपाय योजनांसाठी तब्बल 80 हजार कोटींचे पॅकेज अवश्यक आहे. सरकारने मागील वर्षी अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जाहीर केलेली 17 हजार 500 रुपये हेक्टरी मदत अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. मागील वर्षीच्या विम्याचा छदामही शेतकर्‍यांना मिळालेला नाही. आता यंदा आम्हाला तीही मदत पाहिजे असे म्हणत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मागील वर्षीच्या नुकसान भरपाई बाबतच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष वेधले.


मैक समोर मोबाईलद्वारे व्हिडिओ दाखवत मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी केलेल्या घोषणेचा आवाज उपस्थितांना ऐकवला. विमा वगळता नुकसान भरपाईची रक्कम राज्यातील 45 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होतील या घोषणेची अद्याप अंमलबजावणी नाही. जिल्ह्यातील तालुका निहाय शेतकर्‍यांनी भरलेल्या विमा रकमेची आकडेवारी मांडत कंपन्याकडून शेतकर्‍यांना कवडीही मिळाली नाही, एकमेव पाटोदा तालुक्यासाठी केवळ एक कोटीवर विमा रक्कम शेतकर्‍यांना मिळाली. उर्वरित शेतकर्‍यांना हक्काच्या विम्यापासून वंचित ठेवले आहे. पावसा अभावी यंदा जिल्ह्यात 5 हजार 870 कोटींच नुकसान झालं आहे. राज्यातील 355 तालुक्यापैकी 290 तालुक्यात भिषण दुष्काळाचे वास्तव आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने 5 ऑक्टोबर चा मुहूर्त काढला होता मात्र आम्ही तिथे विरोध केला शरद पवार साहेबांनी सरकारला पत्र दिलं त्यानंतर सरकारचे मंत्री बाहेर पडले आणि दहा दिवस का होईना आगोदर पंचनामे करण्याचं अश्वासन दिलं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे शेतकर्‍यांच्या बांधावर व्हिआयपी पद्धतीने फिरत आहेत. आतापर्यंत तुम्ही रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी किंवा मोर्चा आंदोलनामध्ये शिस्तीसाठी वापरात येणारे बॅरिकेट्स पाहिले पण कधी शेताच्या बांधावर पाहिले का? होय मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात शेताच्या बांधावर बॅरिकेट्स दिसून आले. कारण सामान्य जनता सरकार पर्यंत पोहोचू नये याचा हा बंदोबस्त होता. विमान तळावर मेटल डिटेक्टर लावण्यात येतात कारण विमानात कोणी बंदूक घेवून जाऊ नये. मात्र काल शेतात मेटल डिटेक्टर लावण्यात आले होते. ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीत दुष्काळाची पाहणी करायची त्याच शेतकर्‍याची मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री साहेब आम्ही कापुस, सोयाबीन, बाजरी उत्पादीत करतो बॉम्ब नाही अशी उपरोधक टिकाही त्यांनी केली.


सरकारने येत्या पंधरा दिवसात शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये, शेतमजुरांना 25 हजार रुपये मदत त्यांच्या खात्यात जमा करावी याशिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे यासह दुष्काळी उपाय योजनांच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही समृद्धी महामार्ग बंद पाडू असा इशारा देत आमदार रोहित पवार यांनी सरकारला अल्टिमेट दिला.

Comments


bottom of page