बीडमध्ये सहाय्यक फौजदाराच निघाला मोटारसायकली चोर
- Navnath Yewale
- Jul 9
- 2 min read
ऑनलाईन जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी लढवली अफलातून शक्कल ; आधी बॅटर्या नंतर मोटारसायकली चोरल्या

मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वादाच्या भोवर्यात सापडलेले बीड पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ड्रीम एलेव्हन सारख्या बेटिंग ऍप वर पैसे गमवलेल्या एका सहायक फौजदाराने चक्क दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याला अटक झाली आहे. विशेष म्हणजे या पोलीस अधिकार्याने यापूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बॅटर्या चोरल्या होत्या. आता त्याचे हे प्रकरण उघडकीस आल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे.
ड्रीम एलेव्हन व रमी अॅपमध्ये पैसे बुडाले. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी हा पोलिस चोर बनल्याने तपासात समोर आले आहे. त्यासोबत आणखी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने उशिरा केली. अमित मधुकर सुतार (वय 35) रा. खोकरमोहा, ता. शिरुर कासार, स्वराज कोंडीराम बोबडे (वय 26) रा. अंबिका नगर, बीड आणि हितोपदेश गणेश वडमारे (वय 30) रा. अंकुश नगर बीड असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सुतार हा सहाय्यक फौजदार असून पोलिस अधीक्षक कार्यालयातील वायरलेस विभागात कार्यरत होता.
24 डिसेंबर 2024 रोजी सुतार याने इन्व्हर्टरसाठी लागणार्या 10 बॅटर्या चोरल्या. त्याच्याविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अधिक तपासात त्याच्याकडे तब्बल 58 बॅटर्या निघाल्या. शिवाय एक एलईडी टीव्हीही चोरला होता. सुतारला तेव्हा अटकही झाली होती.
पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी त्याचे निलंबनही केले होते. तो सध्या जामिनावर होता. परंतु त्याला जुगार, दारू ऑनलाईन जुगार, गेम खेळण्याचा छंत होता. यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते. काही लोकांकडून कर्जही घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठीच त्याने चोरीचा मार्ग अवलंबल्याचे सांगण्यात आले.
चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी दोघांची मदत
सुतार याने बीड शहर दोन व शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरल्या. त्या विक्रीसाठी त्याने स्वराज आणि हितोपदेश यांची मदत घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्यांनी सापळा रचून तिघांनाही बेड्या ठोकल्या. सुतारने तीन दुचाकी स्वत:च्या घरी, चार मित्राकडे लपवल्या होत्या. त्याच्याकडून आतापर्यंत सहा गुन्हे उघड झाले आहेत.
Comments