बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठकारे बंधूचा दारुण पराभव
- Navnath Yewale
- 1 day ago
- 2 min read

राजकीय क्षेत्रात धक्का देणारा निकाल बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणुकीत समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येऊन लढवलेल्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळवता आलेली नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील तब्बल 9 वर्षाची सत्ता गमावली असून, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय समीकरणांवर मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. या निकालानंतर भाजपने ठाकरे बंधूंवर राजकीय हल्ला सुरू केला असून, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि आमदार प्रसाद लाड यांनी सोशल मिडियावर मनसे आणि ठाकरे गटाची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता भाजप प्रवक्ते नवनाथ बन, भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी देखील ठाकरे बंधंना डिवचलं आहे.
भाजप प्रवक्ते नवनाथ बन माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज आनंदाचा दिवस आहे. उबाठा आणि मनसेला एकही जागा मिळालेली नाही. समोरच्या पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. विश्वप्रवक्त्यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. मात्र, चार दिवसांआधी यावरूनच पोपटपंची करत होते. आता बोलायला मतचोरी ईव्हीएमचा मुद्दा नाही. बॅलेट पेपरवर मुंबईकरांनी ही निवडणूक विजयी केली आहे. ठाकरे ब्रँडचा टायर पंक्चर झालाय, बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा ब्रँड पंक्चर होणार आहे, ठाकरेंचा ब्रँड पंक्चर होणार आहे. आम्हीच ठाकरे ब्रँड आहोत,हिंदुत्वाला सर्वाधिक मतं मिळाली आणि विजयी केलंय. पक्षीय पातळीवर निवडणुका घेऊ नसे असा आमचा आग्रह होता, मात्र ठाकरे, मनसे यांनी जाणीपूर्वक राजकारण आणण्याचा प्रयत्न केलाय सहकारात राजकारण आणण्याचे काही कारण नव्हते, मात्र आता तुमच्या ब्रँडला असा ठोसा मारला की तो पडला आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटलंय, भाजपसाठी मुंबईकरांचा शुभसंकेत! बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले. कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि “ पत” आणि “पेढी”साठी लढणार्यांच्या हाती मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत! बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे तमाम तथाकथित राजकीय विश्लेषक, मतचोरी झाले म्हणणारे तथाकथित तज्ञ आणि विश्वविख्यात प्रवक्त्यांपासून गल्लोगल्लीतल्या “ निर्भय ” वक्त्यांपर्यंत ..सगळे उघडे, नागडे झाले आहेत. भर पावसात तोंडावर आपटले आहेत. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची !
स्थानिक स्तरावरील छोटी निवडणूक:
संजय राऊत यांनी पराभवावरती भाष्य करताना म्हटलं की, तिथे कोणती युनियन मजबूत त्यावर हे अवलंबून ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही. स्थानिक स्तरावरील छोटी निवडणुक आहे, मला यावर तुम्ही दिल्लीत विचारत आहात, असंही यावेळी राऊतांनी म्हटलं आहे.
निकालाचे समिकरण:
एकूण जागा: 21 , शशांकरावा पॅनेल : 14 जागा, सहकार समृद्धी पॅनेल (प्रसाद लाड, नितेश राणे, किरण पावसकर) :7 जागा, उत्कर्ष पॅनल (राज ठाकरे- उद्धव ठाकरे) : 0 जागा
ठाकरे बंधूंनी उत्कर्ष पॅनल या निवडणुकीत उतरवले होते. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती झाली होती. तर दुसरीकडे महायुतीने सुद्धा ठकारे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भाजप प्रणित श्रमिक उत्कषृ सभा, नितेश यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना तर शिंदेच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शशांकराव पॅनल यांनी सुद्धा आपले 21 उमेदवार रिंगणात उतरवले होते.
Comments