भोंदूबाबा खरात प्रकरणात एसआयटी प्रमुख पहिल्यांदाच माध्यमांसमोर पीडितांच्या धाडसामुळेच तपासाला दिशा; आत्तापर्यंत 4650 अक्षेपार्ह लिंक्स....
- Navnath Yewale
- 5d
- 2 min read

नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात संपूर्ण राज्य हादरलं. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास सुरू असून रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशातच राज्य सरकारने अशोक खरात प्रकरणी तपासासाठी नेमलेल्या एसआयटी प्रमुख तेजस्वीनी सातपुते यांनी तब्बल 17 दिवसांनी पत्रकार परिषद घेत तपासामधील महत्वाची अपडेट दिली आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि आयपीएस अधिकारी यांनी मंगळवारी (दि.17) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी एसआयटीच्या नियुक्तीपासून ते आजपर्यऐत अशोक खरात प्रकरणाच्या तपासाबाबत सविस्तर माहिती दिली.
तेजस्वीनी सातपुते म्हणाल्या की, अशोक खरातविरोधात आत्तापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी तर 2 गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर आणि 1 गुन्ह्याचा तपास नाशिक पोलिस करत आहेत. यात एसआयटीकडे असलेल्या 9 पैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणांसदर्भातले असून 3 गुन्हे फसवणुकीचे असल्याचंही सातपुते यांनी सांगितलं. तसेच आठ आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.
अशोक खरातने पीडित महिलांना त्यांच्या कुटुंबातील लोकांच्या मृत्यूची, बदनामीची भीती दाखवून धमकावत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचंही सातपुते यांनी सांगितलं. तसेच त्यानं लोकांकडून पूजाविधी, खडे, चिंचोके, रुद्राक्ष यांसारख्या माध्यमांतून अंधश्रद्धा पसरवत पैसे उकळल्याचंही एसआयटीच्या तपवासात निष्पन्न झाल्याचं तपास अधिकारी तेजस्वीनी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा एकूण 24 पथकांकडून तपास सुरू असल्याचंही सांगितलं. या प्रकरणासंदर्भात एसआयटीच्या पथकातील 4 जणांच्या सायबर टीमनं आत्तापर्यंत तब्बल अक्षेपार्ह अशा 4650 लिंक हटवल्याची धक्कादायक माहिती दिली. तसेच सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणार्या एकूण 451 अकाऊंट कायमस्वरुपी काढून टाकले असून पीडितांचे व्हिडिओ प्रसारित करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या.
आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी तपासाबाबत महिती दिली. या प्रकरणात आत्तापर्यंत 30 महिलांचे जबाब नोंदवले आहेत. अशोक खरात विराधात आता अनेक महिलांनी हिंमत दाखवली आहे. संबंधित पीडित महिलांनी कुटुंबांना विश्वासत घेऊन धाडस दाखवत पुढे आल्या आहेत. खरातच्या मालमत्तेबाबतचा तपास ईडी आणि एसआयटीकडून संयुक्तरित्या केला जाणार आहे. या 40 ते 45 दिवसांमध्ये 8 गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणार असल्याचंही सातपुते यांनी सांगितलं आहे.



Comments